कोल्हापूर : कोरोना काळात जिल्ह्यातील सात बोगस डॉक्टरांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अजूनही ही प्रक्रिया संपली नसून महाराष्ट्र कौन्सिलकडून त्यांच्याकडे नोंदणी नसल्याचे सिद्ध झाल्यावर या डॉक्टरांच्या बोगसपणावर शिक्कामोर्तब होणार आहे.
जिल्ह्यातील बोगस डॉक्टर्सवर कारवाई करण्यासाठी तीन समित्या कार्यरत आहेत. तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा स्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी आणि नंतरची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत अशा या तीन समित्या आहेत. १ मार्च २०२१ पासून या सात जणांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यातील सहा ग्रामीण भागातील तर एक महापालिका क्षेत्रातील आहे.
तक्रार आल्यानंतर कारवाई करण्याआधी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला जातो. पदवीबाबत अखेरची खात्री करण्यासाठी एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस आणि बीएचएमएस विभागांच्या परिषदांकडे अहवाल मागवला जातो.
१) जिल्ह्यात एकूण बोगस डॉक्टर्सवर कारवाई - ७
२) तालुकानिहाय बोगस डॉक्टर्स
अ - हातकणंगले ४
ब -पन्हाळा १
क - करवीर १
ड -कोल्हापूर महापालिका १
३) सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ
चौकट
कोरोना काळातही घरात राहण्याचा सल्ला
मार्चनंतर कोरोना काळातही दवाखान्यात जाण्याची गरज नाही. मी तुम्हाला घरातच बरे करतो, अशी खात्री यातील एका डॉक्टराने दिली होती. मात्र या पद्धतीने रुग्ण घरातच ठेवल्यानंतर तब्येत अधिक बिघडल्याने अखेर शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागले. याचा मोठा मनस्ताप कुटुंबीयांना सहन करावा लागला.
चौकट
कोरोना काळातील भीतीचा फायदा घेत एका डॉक्टरने गावातच उपचार करण्याच्या नावाखाली केवळ सलाईन लावल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.
चौकट
यातील काही डॉक्टरांकडे पल्स ऑक्सिमीटर, टेम्परेचर गन यासारखी अगदी प्राथमिक आणि आवश्यक असणारी उपकरणे नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
चौकट
तक्रार आल्यानंतरच कारवाई
बोगस डॉक्टरांवर कारवाई करताना शक्यतो तक्रार आली किंवा काही दुर्घटना घडली तरच चौकशी सुरू केली जाते. त्याला कारणही तसेच आहे. शासकीय यंत्रणा अजूनही म्हणावी तशी वाड्यावस्त्यांवर, खेडोपाडी पोहोचलेली नाही. त्यामुळे ऐनवेळी आधार म्हणून यातील अनेक डॉक्टर कार्यरत असतात. ते बोगस आहेत की नाहीत याच्याशी ग्रामस्थांना देणे घेणे नसते. तर ते वेळेला उपयोगी पडत असल्याने शक्यतो तक्रारी होत नाहीत. काही दुर्घटना घडली तर मग चौकशी होते. विनातक्रार अपवादात्मक स्थितीत कारवाई केली जाते.