दीड वर्षात ११७ रेशन दुकानदारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST2021-07-14T04:28:42+5:302021-07-14T04:28:42+5:30
कोल्हापूर : कोरोनासारख्या आपत्ती काळात नागरिकांना रेशनधान्य पुरवण्यात कुचराई केलेल्या, तसेच शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ११७ रेशन दुकानदारांवर जिल्हा ...

दीड वर्षात ११७ रेशन दुकानदारांवर कारवाई
कोल्हापूर : कोरोनासारख्या आपत्ती काळात नागरिकांना रेशनधान्य पुरवण्यात कुचराई केलेल्या, तसेच शासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ११७ रेशन दुकानदारांवर जिल्हा पुरवठा कार्यालयाने कारवाई केली आहे. यापैकी १७ दुकानांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले आहे. तर जिल्ह्यात पार्टेबिलिटी म्हणजेच रेशन दुकानदार बदलण्याचे प्रमाण नगण्य आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य, गरीब नागरिकांना उपाशी राहावे लागू नये यासाठी गेल्यावर्षी केंद्राने रेशनवर मोफत धान्य पुरवण्यास सुरुवात केली. आता पुन्हा एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीसाठी मोफत धान्य दिले जात आहे. पण कोरोनासारख्या कठीण काळातही रेशन दुकानदारांकडून नागरिकांना धान्य पुरवण्यात कुचराई केली जात होती. साठवणूक करणे, नागरिकांना धान्य न देणे, अशा वेगवेगळ्या तक्रारी जिल्हा पुरवठा विभागाकडे येत होत्या. या तक्रारींची तातडीने दखल घेत जिल्हा पुरवठा कार्यालयाने मार्च २०२० पासून गेल्या दीड वर्षात ११७ रेशन दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
एखाद्या रेशन दुकानदाराने धान्य दिले नाही तर दुकानदारच बदलण्याचे प्रमाण कोल्हापूर जिल्ह्यात अगदीच नगण्य आहे. लाभार्थ्यांची नोंद आहे, धान्य मिळण्यासाठी तो पात्र आहे, तरी धान्य मिळत नसेल तर दुकानदाराची चौकशी करून कारवाईच केली जाते.
--
दुकानांवरील कारवाई अशी
जिल्ह्यातील एकूण रेशन दुकानदार : १ हजार ६००
कायमस्वरूपी परवाना रद्द : १७ निलंबित : २५
संपूर्ण अनामत रक्कम जप्त : ३९
५० टक्के अनामत रक्कम जप्त : १
दोषी न आढळलेले : ३
आदेशावर १५
सुनावणीवर : १६
अहवाल येण्याच्या प्रक्रियेवरील : १
------
कारवाईची कारणे
-वेगवेगळी कारणे सांगून नागरिकांना धान्य न देणे किंवा कमी प्रमाणात देणे
-पावती न देणे
-नागरिकांच्या तक्रारी
-पोर्टलवर नोंद न करणे
-दुकानात धान्याचा अपेक्षेपेक्षा कमी किंवा जास्त साठा
-दुकानदाराकडील नोंदी व प्रत्यक्ष विक्रीमध्ये तफावत
-धान्याची साठवणूक किंवा अवैध वाहतूक
------
अंत्योदय शिधापत्रिका : ५२ हजार ७८३, लाभार्थी : २ लाख ३७ हजार २०७ व्यक्ती
प्राधान्य शिधापत्रिका : ५ लात ७ हजार ६६४, लाभार्थी : २२ लाख ७५ हजार ६७७
एकूण शिधापत्रिका : ५ लाख ६० हजार ४४७, लाभार्थी : २५ लाख १२ हजार ८८४
----
कोरोनासारख्या काळात नागरिकांना धान्य मिळण्यात कुचराई किंवा शासकीय नियमांचे उल्लंघन केेलेल्या रेशन दुकानदारांबद्दल तक्रारी आल्या की लगेचच त्याची दखल घेतली जाते. गेल्या दीड वर्षात चौकशी, अहवाल, प्रत्यक्ष जाऊन तपासणी यात दोषी आढळलेल्या दुकानदारांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.
-दत्तात्रय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी
----