भुयारी गटार कामामुळे अपघाताचा धोका
By Admin | Updated: November 30, 2015 01:16 IST2015-11-29T21:17:06+5:302015-11-30T01:16:05+5:30
यड्राव फाटा मार्ग : उपाययोजनांबाबत दुर्लक्ष; पंचगंगा कारखाना-जनता सूतगिरणी मार्ग जीवघेणा

भुयारी गटार कामामुळे अपघाताचा धोका
यड्राव : पंचगंगा साखर कारखान्याकडून जनता सूतगिरणीकडे जाणाऱ्या मार्गावर सुरू असलेले भुयारी गटारीचे काम ठेकेदाराच्या उपाययोजनांअभावी धोकादायक बनले आहे. या मार्गावरील ऊस वाहतूकसह इतर वाहतुकीची रहदारी असूनही मोठ्या खड्ड्याशेजारी सूचना फलक, रात्रीच्या वेळी सावधानता किंवा खड्ड्याभोवती मुरुमाचा ढिगारा करून अपघाताचा संभाव्य धोका टाळण्याची दक्षता ठेकेदाराकडून घेतली नसल्याने याकरिता एखाद्या अपघाताची घटना घडल्यावरच सावधानता व सुरक्षितता उपाय सुचणार का, असा सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे.इचलकरंजी नगरपालिका हद्दीत भुयारी गटारीचे काम सुरू आहे. पंचगंगा साखर कारखान्याकडून यड्राव फाट्याकडे जाणाऱ्या मार्गावर जनता सूतगिरणीपर्यंतच्या हद्दीपर्यंत गटार योजनेचे काम सुरू आहे. या योजनेंतर्गत ड्रेनेज खड्ड्यासाठी सुमारे पंचवीस फूट खोल व पंधरा फूट रुंदीचे खड्डे जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात येत आहेत. अर्धा किलोमीटरच्या अंतरामध्ये असे चार ते पाच मोठे खड्डे काढण्यात आले आहेत. हे काम या रहदारीच्या मार्गावरच सुरू आहे. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. यामुळे या मार्गावर रात्रंदिवस ट्रक, ट्रॅक्टरची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. त्याचबरोबर हा भाग औद्योगिक वसाहतीचा असल्याने मालवाहतुकीची रहदारीही मोठ्या प्रमाणात आहे.भुयारी गटारीचे काम व्हिस्टा कोअर कंपनीकडून सुरू आहे. हे काम सुरू असताना कामाभोवती ठेकेदाराने सावधानतेचा कोणताही सूचना फलक किंवा खड्ड्यामुळे अपघात होऊ नये, याबाबतची दक्षता घेतली नाही. फक्त तांबड्या रेबिनी आडव्या बांधून आपली याबाबतची जबाबदारी संपविल्याचे दाखवून दिले आहे. या उकरलेल्या खड्ड्यांभोवती मुरुमाचा ढिगारा उभारणे, सूचना फलक लावणे, रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसण्यासाठी पांढरा रंग किंवा चुना वापरून सावधानता बाळगण्याची तसदी ठेकेदाराकडून घेतली गेली नाही.हा परिसर औद्योगिक असल्याने रात्रंदिवस कामगार व मालवाहतूक सुरू असते. तसेच सध्या साखर कारखाने सुरू असल्याने वाहनांसाठी व कामगारांसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. एखादे वाहन या खड्ड्यामध्ये अपघातग्रस्त झाले, तर ते सहजपणे दिसून येणार नाही इतकी त्याची रुंदी व खोली असूनही ठेकेदाराकडून याबाबत दुर्लक्ष होत आहे. एखादी घटना घडल्यावरच उपाययोजना सुरू होणार का, असा सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
डे्रनेज बांधकाम पूर्ण : अपघाताची भीती--रस्त्यावरच ड्रेनेजचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याठिकाणी रस्त्यापेक्षा अर्धा फूटवर चेंबरचे बांधकाम आले आहे. यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाले आहेत. ऊस भरून येणारे ट्रक, ट्रॅक्टर यावरून गेले, तर ते उलटून अपघात घडू शकतो. काही ठिकाणी चेंबरलगत खोलगटपणा आल्याने वाहनाचे चाक रूतून अपघाताची शक्यता आहे. ड्रेनेज चेंबरशेजारी मुरुम भरून सपाटीकरण करणे, खड्ड्याभोवती संरक्षक उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.