मेजरचा मुलासह अपघाती मृत्यू

By Admin | Updated: December 24, 2014 00:54 IST2014-12-24T00:52:33+5:302014-12-24T00:54:35+5:30

हुबळीजवळ अपघातात : मृत साबळेवाडीचे; पत्नी, मुलगी बचावली

Accidental Death with Major's Child | मेजरचा मुलासह अपघाती मृत्यू

मेजरचा मुलासह अपघाती मृत्यू

कोपार्डे : साबळेवाडी (ता. करवीर) येथील मेजर तानाजी रामचंद्र पाटील (वय ४२) हे सहकुटुंब बंगलोरहून मोटारीतून गावी परतत असताना हुबळी-धारवाडजवळ व्हन्नापूर गावाशेजारी रस्ता दुभाजकावर मोटार आदळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात तानाजी पाटील हे मोटारीतून बाहेर फेकल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर मुलगा सुयश (वय १२) हा जागीच ठार झाला. तर त्यांची पत्नी सविता (४०), मुलगी समृद्धी (१६)हे जखमी झाले. हा अपघात सोमवारी (दि. २२) झाला.
तानाजी पाटील १९ नोव्हेंबर १९८८ मध्ये कोअर आॅफ सिग्नलमध्ये जवान म्हणून भरती झाले होते. सध्या ते बंगलोर येथे सेवा बजावत होते. मुलांना नाताळची सुटी असल्याने व घरबांधणीचा बेत असल्याने ते बंगलोरहून पहाटे आपल्या आय १० या मोटारीतून पत्नी, दोन मुलांसह गावी येत होते. हुबळीच्या पाठीमागे २० किलोमीटर अंतरावर असताना व्हन्नापूर गावाजवळ असणाऱ्या एका यू टर्नवर तानाजी यांचा मोटारीवरील ताबा सुटल्याने रस्त्यातील दुभाजकावर मोटार आदळली. मोटारीचे दोन्ही दरवाजे उघडल्याने तर दुभाजकावर आदळ्यानंतर चार पलट्या घेतल्याने तानाजी व मुलगा सुयश हे मोटारीतून बाहेर फेकले गेले. यावेळी सुयशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर तानाजी पाटील यांच्या डोक्यालाही गंभीर इजा झाली.
मुलगी व पत्नीने प्रसंगावधान राखत बेळगाव येथील मावसभाऊ उमाजी पाटील यांना अपघाताची माहिती दिली. यानंतर उमाजी यांनी बंगलोर व बेळगाव तसेच आपत्कालीन विभागाला याची तातडीने माहिती दिली. या दरम्यान अर्धा-एक तास गेला होता. धारवाड येथून मिलिटरी कॅम्पचे जवान माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी जखमी अवस्थेत असणाऱ्या तानाजीसह मुलगा सुयश याला हुबळी-धारवाड येथील केएमई रुग्णालयात दाखल केले. तानाजीचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला. तानाजी वयाच्या १६व्या वर्षीच १९८८ मध्ये आर्मीमधील कोअर आॅफ सिग्नलमध्ये भरती झाले. दोन वर्षांपूर्वीच त्यांना रेकॉर्डस् पॅराशूट रजिमेंट, बंगलोरमध्ये मेजर पदावर बढती मिळाली होती. अत्यंत धाडसी, मनमिळावू, होतकरू असणाऱ्या तानाजीचा अपघाती अंत झाल्याचे समजताच खुपिरे पंचक्रोशीत शोककळा पसरली. आज सकाळी आठच्या दरम्यान पिता-पुत्राचे मृतदेह बंगलोरहून कॅप्टन अनंतकुमार आपल्या साथीदारांसह घेऊन आले. यावेळी अत्यंत शोकमय वातावरणात सजवलेल्या ट्रॅक्टरमधून दोनवडे फाटा, साबळेवाडी, खुपिरे व वाकरे फाटा येथील घरापर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. घराजवळील शेतातच त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी १०९ मराठा लाईट इन्फंट्रीचे कर्नल एम. के. सचान, जवानांनी व करवीरचे पीआय रोहिदास गवारे, हवालदार डी. के. शिंदे यांनी मानवंदना दिली.

जेवायला येतोयचा मेसेज अन काळाचा घाला
अपघाताच्या अर्ध्या तासापूर्वी बेळगाव येथील मावसभाऊ प्रा. उमाजी पाटील यांना आम्ही तीन साडेतीन वाजेपर्यंत जेवायला तुझ्याकडे पोहोचतोय असा एसएमएस केला, पण केवळ अर्ध्या तासातच मुलगी समृद्धीने उमाजींना आपल्या गाडीला अपघात झाल्याचे फोनवरून सांगताच त्यांना धक्काच बसला. त्यांनी प्रसंगावधान राखून सर्व संबंधित यंत्रणेला याची तत्काळ माहिती देऊन तातडीने मदतीची उपलब्धता केली.


घरकुलाचे स्वप्न बाळगून तानाजी व पत्नी सविता हे गावी येत होते. मात्र, पती व मुलगा सुयश अपघातात गमावले. सविता व मुलगी समृद्धी यांना फक्त खरचटले आहे. आपल्या डोळ्यादेखत पती व मुलगा गमवावा लागलेल्या सविता पाटील यांचे घरकुलाचे स्वप्न उद्ध्वस्त झाले.


नातेवाइकांचा आक्रोश अन् उपस्थितांचे डोळे पाणावले
मेजर तानाजी पाटील व सुयश यांचे मृतदेह घराजवळ येताच नातेवाइकांनी हंबरडा फोडला. आई सावित्री, पत्नी सविता, मुलगी समृद्धी, भाऊ यांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला. यामुळे उपस्थितांचेही डोळे पाणावले.

Web Title: Accidental Death with Major's Child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.