अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड हालचालींना आजपासून वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST2021-07-07T04:31:50+5:302021-07-07T04:31:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी केवळ पाच दिवस उरल्याने बुधवारपासून याबाबतच्या हालचाली वेग घेतील. ...

अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड हालचालींना आजपासून वेग
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी केवळ पाच दिवस उरल्याने बुधवारपासून याबाबतच्या हालचाली वेग घेतील. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील हे दाेघेही अधिवेशनाच्या निमित्ताने मुंबईत आहेत. ते गुरुवारी कोल्हापुरात येण्याची शक्यता आहे. भाजप, ताराराणी आघाडीच्या सदस्यांची प्राथमिक बैठक बुधवारी सायंकाळी कोल्हापुरात होणार असल्याचे सांगण्यात आले.
महाविकास आघाडीची सध्या जिल्हा परिषदेत सत्ता असून स्वाभिमानी शेतकरी संघटनाही त्यांच्यासोबत आहे. निवडी १२ जुलैला हाेणार आहेत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत आणि अमर पाटील यांनी सोमवारी गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्याचा दौरा करून सदस्यांची भेट घेतली आहे.
दुसरीकडे भाजपने ताराराणीसह आपल्या सदस्यांची बुधवारी सायंकाळी पाच वाजता बैठक बोलावली आहे. भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या निवासस्थानी ही बैठक होण्याची शक्यता आहे. घाटगे यांच्यासह यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर यावेळी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीत एकूणच सध्याच्या स्थितीचा आढावा घेवून सदस्यांची मते जाणून घेतली जाणार आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेचे बहुतांशी सदस्य नेत्यांच्या शब्दाबाहेर नाहीत. परंतु शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेताना शिवसेनेच्या राज्यस्तरीय नेत्यांचीसुद्धा दमछाक झाली. त्यामुळे शिवसेनेत आणि कोणी नाराज आहे का, याचीही चाचपणी सुरू करण्यात आली आहे.
चौकट
पी. एन. यांच्यामुळे भाजपची कोंडी
आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल हे अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री पाटील यांची भेट घेतली होती. परंतु राहुल भेटल्यानंतर अर्ध्या तासातच ज्या पद्धतीने मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचा असेल, अशी घोषणा केली, ते पाहता राहुल यांचा पत्ता कट झाल्याचे मानले जाते. या पार्श्वभूमीवर पी. एन. यांनी राहुल यांना रिंगणात उतरावे असा आग्रह भाजपकडून झाल्याची चर्चा आहे. परंतु भाजपच्या पाठिंब्यावर मी मुलाला अध्यक्ष करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पी. एन. यांनी मांडल्यामुळे भाजपची कोंडी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
चौकट
गेल्यावेळचे ठरलेले पैसे आधी द्या
गेल्यावर्षी सत्तांतर करताना आधी भाजपसोबत असणाऱ्या सदस्याला ‘लाखमोलाचा’ प्रस्ताव देण्यात आला. संबंधित महिला सदस्य बाहेर पडल्यानंतरच भाजपकडे गळती सुरू झाली. परंतु त्यांना ठरलेल्या ‘निधी’तील पहिला हप्ताच त्यावेळी देण्यात आला. अजून मोठ्या रकमेचा हप्ता शिल्लक असल्याने संबंधित सदस्य महिलेच्या पतीने गेले महिनाभर कारभाऱ्यांकडे तगादा लावला. परंतु निर्णय होत नसल्याने गेले दोन दिवस संबंधितांने फोनच घेणे बंद केल्याने कारभाऱ्यांची धावपळ उडाली. प्रत्यक्ष भेटीवेळी हा विषय दोन दिवसात संपवण्याचे ठरले. निवड पाच दिवसांवर आल्यावर आता रूसवे फुगवे वाढले आहेत.
चौकट
पुन्हा विनय कोरे, सत्यजित पाटील यांच्याकडे लक्ष
‘गोकूळ’ निवडणुकीच्या निमित्ताने विनय कोरे यांनी मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यासमवेत जाणे पसंद केल्याने आता पुन्हा कोरे काय भूमिका घेणार याकडेही साऱ्यांचे लक्ष आहे. जनसुराज्यचे काही सदस्य महाविकास आघाडीसोबत राहण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे कोरे पुन्हा चर्चेत येणार आहेत. तर ‘गोकूळ’मध्ये पराभवाचा झटका बसलेले माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर हे देखील काय भूमिका घेणार याची देखील अनेकांना उत्सुकता आहे.