शिक्षकाचे विद्यार्थिनीशी गैरवर्तन
By Admin | Updated: April 5, 2015 00:35 IST2015-04-05T00:35:16+5:302015-04-05T00:35:16+5:30
आजऱ्यात पालक संतप्त : संस्था अध्यक्षांचे कायदेशीर कारवाईचे आश्वासन

शिक्षकाचे विद्यार्थिनीशी गैरवर्तन
आजरा : येथे महंमद अजीज बशीर लतिफ या शिक्षकाने शाळेतील १३ वर्षीय मुलीशी गैरवर्तन केल्यामुळे संतप्त पालकांनी जमावाने जाऊन शाळा प्रशासनाला धारेवर धरले. संस्था अध्यक्ष आदमसाब माणगावकर यांनी संबंधितावर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण निवळले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संतोष बडे यांनी मध्यस्थी केली.
लतिफ हा शिक्षक मुलींशी गैरवर्तन करीत असल्याची चर्चा विद्यार्थिनींसह शिक्षकवर्तुळात होती. यापूर्वीही एका विद्यार्थिनीशी त्याने असभ्य वर्तन केल्याने त्याचे संबंधित मुलीशी लग्न लावून दिले होते. गेले पंधरा दिवस त्याचे हे प्रकरण सुरू होते. अखेर संबंधित मुलीने आपल्या पालकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर मात्र शाळेतील सर्वच पालक संतप्त झाले.
शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पालक मोठ्या संख्येने शाळेच्या प्रांगणात जमले. संबंधित शिक्षकावर निलंबनाची कारवाई करा, अन्यथा आमच्या पाल्यांचे दाखले परत द्या, अशी आक्रमक भूमिका पालकांनी घेतली. प्रचंड संख्येने आलेला पालकांचा जमाव पाहून पोलिसांना पाचारण केले. संस्थेचे अध्यक्ष माणगावकरही शाळेत हजर झाले. त्यांनी पालकांची समजूत घालण्यास सुरुवात केली.
संतप्त पालकांमुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलीस उपनिरीक्षक बडे, सहाय्यक फौजदार नजीर पटेल, अल्ताफ सय्यद, गणेश हांग्ये आदींनी पालकांची समजूत घातली.
शाळा व्यवस्थापनाच्यावतीने माणगांवकर यांनी संबंधित शिक्षकाला रितसर नोटीस काढल्याचे सांगितले. शाळा व्यवस्थापन समिती, सर्व शिक्षक, संबंधित पालक यांची सोमवारी बैठक माणगांवकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)