शिक्षकाचे विद्यार्थिनीशी गैरवर्तन
By Admin | Updated: October 16, 2014 22:54 IST2014-10-16T22:32:48+5:302014-10-16T22:54:05+5:30
अमेणीतील घटना : मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांना चोप

शिक्षकाचे विद्यार्थिनीशी गैरवर्तन
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील अमेणी प्राथमिक शाळेतील शिक्षक शशिकांत शामराव कदम (वय ४०, रा. भेडसगाव, ता. शाहूवाडी) याने सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीशी गैरवर्तन केले. या प्रकरणी ग्रामस्थांनी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांना चोप दिला. या घटनेने शिक्षक वर्गात खळबळ उडाळी आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गेल्या गुरुवारी (दि. ९) नेहमीप्रमाणे शाळा भरली. या शाळेत पहिली ते सातवीचे वर्ग भरतात. येथे चार शिक्षक शिकवितात. दुपारी दोन वाजता मुलांची जेवणाची सुटी झाली. त्यावेळी वर्गात कोणी नाही, असे पाहून सातवीत शिकणाऱ्या मुलीशी शशिकांत कदम याने गैरवर्तन केले.
त्या मुलीने घाबरून शाळेत जाण्यास नकार दिला. त्यामुळे तिच्या आईने चौकशी केली असता घडलेला प्रकार मुलीने सांगितला. विधानसभा निवडणूक असल्यामुळे शिक्षक निवडणुकीच्या कामात होते. त्याने मुलीला कोणाला सांगू नकोस, अशी धमकी दिली होती. या प्रकारानंतर ग्रामस्थ व तंटामुक्ती अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष यांनी शिक्षकाकडून लेखी लिहून घेऊन प्रकरण मिटविले होते. मात्र, गावातील तरुणांना याचा सुगावा लागला. आज, गुरुवारी सकाळी ११ वाजले तरी शिक्षक, मुख्याध्यापक हजर नव्हते. केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक शाळेत आले असता या दोघांना ग्रामस्थांनी चोप दिला. त्यानंतर प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेस भेट देऊन माहिती घेतली. या शाळेत वेळेवर शिक्षक येत नाहीत. मुख्याध्यापक मद्यपान करून शाळेत येतात, असा आरोप पालकांनी केला. विद्यार्थ्यांना वेळेवर पोषण आहार दिला जात नाही. संपूर्ण शाळेचा बोजवारा उडाला आहे, अशी तक्रार पालकांनी केली. चार महिन्यांपूर्वी या शाळेत अशीच घटना घडली होती, अशी चर्चा पालकांत होती. संबंधित शिक्षकाला निलंबित करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा चंद्रकांंत कदम यांनी दिला आहे. तसेच संबंधित शिक्षकाला शिक्षण विभागाने तातडीने निलंबित करावे, अशी मागणी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रंगराव पाटील यांनी केली आहे.