इतिहासातील अचूक नोंदी धुंडाळणारा अवलिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2016 00:52 IST2016-07-04T00:52:55+5:302016-07-04T00:52:55+5:30

अनमोल ठेवा : बाबासाहेब आंबेडकर, सावरकर, साने गुरुजी, राजीव गांधी, आदींचा समावेश

Above all, the exact entries in history | इतिहासातील अचूक नोंदी धुंडाळणारा अवलिया

इतिहासातील अचूक नोंदी धुंडाळणारा अवलिया

संतोष तोडकर ल्ल कोल्हापूर
देशात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे अनेक रथी-महारथी होऊन गेले. इतिहास त्यांची दखलही घेतो परंतु त्यांच्या जन्म-मृत्यू नोंदीवर इतिहासकारांचे मतभेद असलेले दिसून येतात. त्यापुढे किमान ज्यांचे शक्य आहे त्यांची जन्म-मृत्यू नोंद अचूक असावी व ती संग्रहित करून एकत्रितपणे उपलब्ध करून द्यावी, असे अमेय गुप्ते या अवलियाने मनावर घेतले आहे. आजवर पस्तीसहून अधिक महनीय व्यक्तींच्या दाखल्यांचा संग्रह त्यांनी केला आहे.
सर्वसामान्य नागरिकांना आपल्या पूर्वजांच्या जन्म-मृत्यू दाखल्यांची मागणी के ली की, आता तो उपलब्ध असेल का ? मिळेल का? किती दिवस लागतील, किती खर्च येईल? असे एक ना अनेक प्रश्न पडतात पण गुप्ते यांनी अशा अनेक समस्यांचा विचार न करता पदरमोड करत महनीय व्यक्तींच्या दाखल्याचा संग्रह सुरू ठेवला आहे. राम गणेश गडकरी यांच्या वाङ्मयाचे अभ्यासक असलेले गुप्ते मुंबई येथे वास्तव्यास असतात तर कोल्हापूर हे त्यांचे आजोळ आहे.
विश्वकोशाच्या संकेतस्थळावर भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा मृत्यू, दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म, फिरोजशाह मेहता यांच्या मृत्यूच्या तारखा चुकीच्या असल्याचे विश्वकोश निर्मिती समितीच्या निदर्शनास आणून दिल्या.बृहन्मुंबई, पुणे, कोल्हापूर महापालिकांच्या विविध प्रभाग कार्यालयात जाऊन आतापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी, वसंत देसाई, सेनापती बापट, पु. ल. देशपांडे, राजीव गांधी, श्रीपाद नारायण राजहंस ऊर्फ बालगंधर्व, गदिमा, गोपाळ नीळकंठ दांडेकर, अण्णा भाऊ साठे यांचे दाखले मिळविले आहेत.
एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यास त्या व्यक्तीचा पहिला मृत्यू नोंदणी दाखला हा मोफत दिला जातो आणि त्यानंरच्या प्रत्येक प्रतीसाठी विशिष्ट रक्कम आकारली जातो. जन्म-मृत्यू दाखल्यांचा संग्रह करताना गुप्ते यांना पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी सुनीता, राम गणेश गडकरी यांच्या पत्नी रमाबाई, शंकर केशव कानेटकर, कवी गिरीश, गोपाळ नरहर नातू यांच्या मृत्यू दाखल्यांच्या प्रती या फ्री कॉपी म्हणून मिळाल्या. याचा अर्थ या व्यक्तींच्या दाखल्यांची आजतागायत संबंधित विभागाकडे कोणी मागणी कशी केली नाही, याबद्दल गुप्ते यांनी आश्चर्य व्यक्त केले.
जुन्या जन्म-मृत्यू नोंदी काढणे अडचणीचे
कोल्हापूर महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाकडे सन १९०४ ते १९१८ या कालावधीतील नोंदी या मोडी लिपीतील असून, त्यांचे रजिस्टर जीर्ण व फाटलेले आहे. तर सन १९१९ ते आजपर्यंतचे रेकॉर्ड मराठीत असल्याचे गुप्ते यांनी सांगितले. राजर्षी शाहू महाराजांचा मृत्यू मुंबईतील पन्हाळा लॉज बंगला येथे झाला पण त्याची नोंद कोल्हापूर महानगरपालिकेकडे मिळाली. त्यावर ‘श्रीमंत महाराज शाहू छत्रपती सरकार करवीर’ असा नामोल्लेख असून, मृत्यूचे ठिकाण कोल्हापूर अशी नोंद आहे.
विविध क्षेत्रांतल्या मान्यवर व्यक्तींच्या जन्म-मृत्यूची दप्तरी नोंद नसल्याने तारखेवरून वाद निर्माण होतो. तो होऊ नये आणि त्यांच्या जन्म व मृत्यूची नोंद किंवा पुरावा आपल्याकडे असावा या उद्देशाने हे काम हाती घेतले आहे.
- अमेय गुप्ते, संग्राहक

Web Title: Above all, the exact entries in history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.