कोल्हापूर : अवैधरित्या गर्भपात तसेच गर्भनिदान करण्याचा व्यवसाय करणाऱ्या एका दवाखान्यावर तसेच लॅबवर पीसी-पीएनडीटी समिती तसेच पोलिसांनी छापा टाकून डॉक्टरसह तिघांना पकडले. गर्भपात व गर्भनिदान यासाठी वापरले जाणारे मशीन, अन्य उपकरणे, औषधे जप्त करण्यात आली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. रात्री उशिरापर्यंत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. पीसीपीएनडीटी पथकाच्या तक्रारीवरून डॉ. डी. बी. पाटील (रा.सध्या राजलक्ष्मीनगर, कोल्हापूर, मूळ घाणवडे, ता.करवीर) तंत्रज्ञ बजरंग श्रीपती जांभिलकर (रा. महाडिकवाडी, ता.पन्हाळा) गजेंद्र उर्फ सनी बापूसाहेब कुसाळे (रा. सिरसे, ता. राधानगरी) यांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.कोल्हापुरातील फुलेवाडी परिसरातील प्रतीक्षा क्लिनिक तसेच वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगर येथे अवैधरित्या गर्भपात तसेच गर्भनिदान होत असल्याची माहिती पीसीपीएनडीटी समितीकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार समिती सदस्या गीता हसूरकर व पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस कॉन्स्टेबल धनश्री पाटील यांनी पद्धतशीरपणे सापळा लावला. पोलिस विभागाने धनश्री यांना बनावट ग्राहक म्हणून तर गीता यांना तिची मैत्रीण म्हणून या मोहिमेवर पाठविले.बुधवारी रात्री धनश्री यांनी फुलेवाडी येथील प्रतीक्षा क्लिनिकचे डॉ. डी. बी. पाटील यांना पुण्याहून बोलत असल्याचे सांगून गर्भपात करायचा असल्याचे सांगितले. फोनवरील चर्चेत आधी ३५ हजार रुपये खर्च येईल असे डॉक्टरने सांगितले. गुरुवारी सकाळी रंकाळा तलाव परिसरात या असेही सांगितले. त्यानुसार धनश्री व तिची मैत्रीण बनून गेलेल्या गीता यांनी गुरुवारी सकाळी रंकाळा तलाव परिसरात ३५ हजार रुपये दिले. त्यानंतर डॉक्टरने एक गोळी दिली. त्यानंतर त्यांना आणखी १५ हजार रुपये घेऊन सायंकाळी पाच वाजता या असे सांगितले.सायंकाळी पाच वाजता दोघी फुलेवाडीतील दवाखान्यात गेल्या तेव्हा डॉक्टर तेथे नव्हते. फोनवर चर्चा केली तेव्हा बजरंग जांभिलकर तपासतील त्यांना भेटा असे सांगितले. परंतु त्याठिकाणी जांभिलकर देखील भेटला नाही. त्याच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्याने मी जोतिबा डोंगरावर असल्याचे सांगितले. त्यामुळे पथक त्याठिकाणी गेले. परंतु तो तेथेही भेटला नाही. शेवटी पोलिसांनी त्यांचे मोबाईल लोकेशन शोधून काढले. त्यावेळी बुधवार पेठेतील एका लॅबमध्ये असल्याचे कळले.बुधवार पेठेतील धन्वंतरी लॅबमध्ये पथक गेेले त्यावेळी तेथे अन्य दोन तीन रुग्ण वेटिंगला होते. त्याठिकाणी सनी कुसाळे हा तरुणही होता. पथकातील डॉक्टरांनी लॅबमध्ये तपासणी केली. त्यावेळी जांभिलकर यांच्या सॅकमध्ये सोनाग्राफीचे मशीन सापडले. औषधे, सलाईन, काही इंजेक्शन मिळून आली. सायंकाळी डॉ. पाटील याच्या गाडीची तपासणी केली असता गर्भपात करण्याची औषधे सापडली.कारवाई करणाऱ्या पथकात डॉ. प्रकाश पावरा, डॉ. सुदर्शन पाटील, गीता हासूरकर, कॉन्स्टेबल धनश्री पाटील पीसीपीएनडीटीच्या कायदा सल्लागार ॲड. गौरी पाटील यांचा समावेश होता. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी सुदर्शन पाटील यांनी फिर्याद दिली असून रात्री उशिरापर्यंत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
पाच पदव्या बोगसडॉ. डी. बी. पाटील याच्या नावावर पाच पदव्या असल्याचे सर्टिफिकेटस् मिळाली आहेत. परंतु ती बोगस असून चार लाखात विकत घेतल्याचे त्याने पथकासमोर कबूल केले. त्यामुळे डॉक्टरही बोगस असल्याचे स्पष्ट झाले.
कुसाळे सूत्रधारगतवर्षी कोल्हापुरातील क्रांतीसिंह नाना पाटीलनगरमध्ये उघड झालेल्या गर्भलिंग चाचणी प्रकरणातही संशयित गजेंद्र उर्फ सनी कुसाळे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यावेळी अन्य संशयितांना अटक झाली परंतु कुसाळे पसार झाला होता. गेले वर्षभर पोलिसांनाही तो चकवा देत होता. गुरुवारी मात्र तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या गोरखधंद्यातून पैसे मिळत असल्याने तोच सुरुवातीला एजंट म्हणून काम करत होता. नंतर तोच मुख्य सूत्रधार झाला. कसाबसा बारावीपर्यंत तो शिकला आहे. त्याच्यावर याच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.