अभिजित चौधरी कोल्हापूर महापालिकेचे नवे आयुक्त
By Admin | Updated: March 25, 2017 00:42 IST2017-03-25T00:42:42+5:302017-03-25T00:42:42+5:30
पी. शिवशंकर यांच्या बदलीचे ठिकाण अस्पष्ट
अभिजित चौधरी कोल्हापूर महापालिकेचे नवे आयुक्त
कोल्हापूर : महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून डॉ. अभिजित चौधरी यांची शुक्रवारी नियुक्ती झाली. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास महापालिकेला ही माहिती प्राप्त झाली. दरम्यान, विद्यमान आयुक्त पी. शिवशंकर यांची बदली कुठे झाली हे समजू शकले नाही.
मूळचे जळगाव जिल्ह्यातील असलेले चौधरी २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. औरंगाबादला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी दोन वर्षे काम केले आहे. भंडारा येथे गेल्या नऊ महिन्यांपासून ते जिल्हाधिकारी होते. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे कार्यकर्ते व विधानपरिषदेचे आमदार परिणीत फुके यांच्याशी त्यांचे मतभेद झाले; त्यातूनच त्यांची बदली झाल्याची चर्चा भंडारा जिल्ह्यात आहे. अभिजित चौधरी हे एम.बी.बी.एस. आहेत.
चौधरी कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून ३१ मार्चनंतर कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे. शक्य तेवढे चांगले काम करण्याचा आपला प्रयत्न राहील, अशी ग्वाही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
पी. शिवशंकर यांनी ३१ जानेवारी २०१५ रोजी कोल्हापूर महानगरपालिकेत आयुक्त म्हणून कार्यभार घेतला होता. त्यांना येथे काम करण्यासाठी केवळ दोन वर्षांचा कालावधी मिळाला. या काळात त्यांनी महानगरपालिकेचे कामकाज आॅनलाईन करण्यास प्राधान्य दिले. ई-आॅफिसच्या सर्व सुविधा त्यांनी दिल्या. आॅफिस रेकॉर्डचे डिजिटायझेशन करण्यावर त्यांनी अधिक भर दिला. त्यांच्या काळात नोकरभरतीही मोठ्या प्रमाणात झाली. ‘एक प्रामाणिक अधिकारी’ म्हणून त्यांची ओळख होती परंतु त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे अधिकारी व नगरसेवक पदाधिकाऱ्यांत मतभेद निर्माण झाले होते. त्याचे पडसाद कामकाजावर सतत उमटत राहिले. (प्रतिनिधी)