अपहृत युवकाचा दगडाने ठेचून खून
By Admin | Updated: April 24, 2016 00:53 IST2016-04-24T00:53:00+5:302016-04-24T00:53:00+5:30
चौघांवर संशय : युवक तारदाळचा; पाच दिवसांपूर्वी झाले होते अपहरण

अपहृत युवकाचा दगडाने ठेचून खून
इचलकरंजी : तारदाळ (ता. हातकणंगले) येथील पाच दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. अजित वसंत वाघमारे (वय ३०) असे त्याचे नाव आहे. अजितचा मृतदेह कर्नाटकमधील कागवाडजवळ एका उसाच्या शेतात आढळून आला. मात्र, चेहरा ओळखत नसल्याने अंगातील कपड्यावरून तो असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस रात्री उशिरापर्यंत खातरजमा करीत होते.
याबाबत पोलिस निरीक्षक सतीश पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अद्याप अधिकृत माहिती नसल्याचे बेजबाबदार उत्तर दिले. त्याचवेळी या प्रकरणातील आरोपींचा चार दिवसांपासून पोलिस शोध घेत आहेत. मात्र, अद्याप कोणतेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. हा खून वर्चस्ववादातून झाल्याचे बोलले जात आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, तारदाळमधील कृष्णानगर येथे राहणाऱ्या अजित वाघमारे याच्या घरात १९ एप्रिलला दुपारी घुसून चौघांनी तोडफोेड करीत मोटारसायकलवरून त्याचे अपहरण केले होते. तो घरी न परतल्याने त्याची पत्नी दीपाली वाघमारे यांनी अमोल माळी, सूरज शिर्के यांच्यासह चौघांनी पती अजित वाघमारे यांचे अपहरण केल्याची फिर्याद शहापूर पोलिस ठाण्यात दिली होती. दरम्यान, वाघमारे यांचा घातपात झाल्याची चर्चा शहापूर, तारदाळ परिसरात दबक्या आवाजात सुरू होती. याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जागे झालेल्या शहापूर पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला. दोन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तपासासाठी पथके कर्नाटककडे रवाना झाली. त्यानंतर शनिवारी या पथकाला सुगावा लागला आणि अजित वाघमारे यांचा मृतदेह कागवाडजवळील शिळेवाडी येथे उसाच्या शेतात मृतदेह आढळून आला. मृतदेह दगडाने ठेचलेल्या स्थितीत होता. कपड्यावरून तो अजित असल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे. तरी पोलीस रात्री उशीरापर्यंत खातरजमा करीत होते.
संशयित आरोपी सराईत गुन्हेगार
खून झालेला अजित वाघमारे हा गवंडी कामगार दीपक मस्तुद याच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी होता. तसेच अजितच्या पत्नीने ज्यांच्यावर संशय व्यक्त केला आहे, ते अमोल माळी व सूरज शिर्के हे सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर)