आबा-काका गटांत धुमश्चक्री
By Admin | Updated: August 2, 2015 00:12 IST2015-08-02T00:08:07+5:302015-08-02T00:12:59+5:30
तासगावात रणकंदन : बाजार समिती मतदानावेळी वाद; पोलीस उपअधीक्षकांसह तिघे जखमी; राष्ट्रवादीचा बूथ उधळला

आबा-काका गटांत धुमश्चक्री
तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानावेळी शनिवारी दुपारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत जोरदार धुमश्चक्री झाली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दगडफेक झाली. राष्ट्रवादीचा बूथ उधळून लावला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी यांच्या गाडीचा चक्काचूर करण्यात आला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. या घटनेत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांसह पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व तीन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले.
तासगाव बाजार समितीसाठी शनिवारी मतदान झाले. येथे दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील गट आणि भाजपचे खासदार संजयकाका पाटील गटात वैमनस्य आहे. येथील यशवंत हायस्कूलच्या इमारतीत मतदान केंद्र होते. सकाळी आठला मतदानास सुरुवात झाली. तेथे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांबरोबरच राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील आणि खासदार संजयकाका पाटील स्वत: ठाण मांडून होते. अकरा वाजल्यापासून मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. तेव्हापासून परिस्थिती तणावसदृश दिसू लागली. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दंगल नियंत्रण पथक बोलावून घेतले. दुपारी दोनच्या सुमारास राष्ट्रवादीचे दिनकरदादा पाटील आणि निवास पाटील यांनी हमाल गटातील मतदार मतदान केंद्रावर आणले. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत किरकोळ कारणावरून मतदान केंद्राबाहेरच बाचाबाची झाली. त्यातूनच दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी झाली. राष्ट्रवादीचे दिनकरदादा पाटील, निवास पाटील, संजय पाटील, ताजुद्दीन तांबोळी यांना मारहाण झाली, तर भाजपचे अमित पाटील हेही जखमी झाले. राष्ट्रवादीच्या दिनकरदादा पाटील यांना होणारी मारहाण थांबविताना पोलीस उपअधीक्षक पिंगळे हेही जखमी झाले. कार्यकर्त्यांची पांगापांग करताना तीन पोलीस कर्मचारीही किरकोळ जखमी झाले.
दोन्ही गटांत हाणामारी सुरू झाल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह राखीव पोलीस दलाची एक तुकडी घटनास्थळी हजर झाली. यावेळी पाटील आणि काही कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्यानंतर गर्दी पांंगली. मतदान केंद्राला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. तणावपूर्ण परिस्थितीतच सायंकाळी चारपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. (प्रतिनिधी)
ताजुद्दीन तांबोळींची गाडी चक्काचूर
राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी यांची मोटार काही कार्यकर्त्यांनी दगड घालून चक्काचूर केली. त्यांच्या इनोव्हा (एमएच ०९ बीडी २२५५) मोटारीवर दगडफेक करून सर्व बाजूंनी चुराडा केल्याचे चित्र दिसून येत होते.
सुमनतार्इंसह कार्यकर्ते पोलीस बंदोबस्तात रवाना
मतदान केंद्रावर भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाल्यानंतर आमदार सुमनताई पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मतदान केंद्राजवळ असणाऱ्या कार्यालयात थांबले होते. परिस्थिती नियंत्रणाखाली आल्यानंतर माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील, रोहन सुरेश पाटील, राहुलअण्णा पाटील, मेधाताई झांबरे यांना पोलीस बंदोबस्तात अंजनी येथे सोडण्यात आले. मतदान केंद्राजवळच्या राष्ट्रवादीच्या इतर कार्यकर्त्यांनाही पोलीस बंदोबस्तातच हलविण्यात आले.
पोलिसांचा कॅमेरा बंद पाडला
कार्यकर्त्यांत धुमश्चक्री सुरूझाली, तेव्हा घटनास्थळावर पोलिसांची संख्या अपुरी होती. त्यातच मतदान केंद्राच्या चारही बाजूंनी कार्यकर्ते घुसल्यामुळे पोलीस सर्वच बाजूला विभागले गेले. घटनास्थळाचे चित्रीकरण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना काही कार्यकर्त्यांनीच दमदाटी करून चित्रीकरण बंद करायला भाग पाडले. सुरुवातीला काही काळ परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर होती. पोलिसांच्या तुकड्या दाखल झाल्यानंतर मात्र हुल्लडबाज कार्यकर्ते पसार झाले.