‘आयो रे मारो ढोलना...’
By Admin | Updated: October 16, 2015 00:36 IST2015-10-16T00:18:13+5:302015-10-16T00:36:51+5:30
रास दांडिया : ‘लोकमत’ व ‘आॅयस्टर जैन्स’च्या वतीने आयोजन; सांचीने आणली रंगत

‘आयो रे मारो ढोलना...’
कोल्हापूर : ‘ढोल तारो ढोल बाजे...’ अशा हिंदीसह गुजराती गीतांच्या तालावर रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषेत हातात टिपऱ्या घेऊन गरब्याच्या गीतांवर थिरकणाऱ्या युवक-युवतींनी नवरात्रीतील रास दांडिया कार्यक्रमात बुधवारी रात्री जल्लोष केला. सोबतच्या नेत्रदीपक विद्युत रोषणाईने व ‘बालिका वधू’ मालिकेतील अभिनेत्री सांचीने कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेले. निमित्त होेते, ‘लोकमत’ व ‘आॅयस्टर जैन्स’च्या वतीने आयोजित ‘रास दांडिया’चे. शाहू मार्केट यार्ड येथील मुस्कान लॉन येथे नवरात्रीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राहुल राठोड, धैर्यशील माने, कपिल ओसवाल, कुंदन ओसवाल, भावेश ओसवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दुर्गामातेची आरती करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. रात्री दहाच्या सुमारास अभिनेत्री सांची यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच उपस्थितांनी एकच जल्लोष करून त्यांचे स्वागत केले. त्यांनीही हातात टिपरी घेऊन गरबा व दांडिया नृत्य केले. त्यामुळे स्पर्धकांतही उत्साह निर्माण झाला. यानंतर कपल राउंड, दांडिया राउंड व फायनल राउंड झाले. रास दांडिया कार्यक्रमात राजस्थानी व गुजराती पारंपरिक वेशभूषेतील दोनशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.
‘डान्स इंडिया डान्स’शोचे ‘सर्वोत्कृष्ट डान्सर’ कुणाल फडके यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती. मोनिका करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. ओसवाल ज्वेलर्स हे कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक होते, तर महेंद्र ज्वेलर्स, हॉटेल अयोध्या, आय लेव्हल अॅडव्हर्टायझिंग, एस. पी. एन. न्यूज यांचे याला सहकार्य लाभले होते.
कार्यक्रमास आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, प्रतिमा पाटील यांनी भेट दिली. आॅयस्टर जैन्स ग्रुपचे अतीश ओसवाल, वैभव ओसवाल, भूषण ठकर, सिद्धार्थ जैन, नूपल सुराणा, आदींसह मोठ्या प्रमाणात ‘लोकमत सखी मंच’ सदस्या व नागरिक उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल असा -
बेस्ट ग्रुप : रंगिलो ग्रुप, बेस्ट ड्रेस : मेल - जीवन ओसवाल. बेस्ट ड्रेस : फिमेल - निकिता नोतानी, बेस्ट गरबा : मेल - अतीश ओसवाल. बेस्ट गरबा : फिमेल - सोनिया राठोड, बेस्ट दांडिया : मेल - हितेश जैन, बेस्ट दांडिया फिमेल : भूमी शहा, बेस्ट दांडिया : मेल : अमर संघवी, बेस्ट कपल : फिमेल - भाग्यश्री ओसवाल.