आजरेकरांनी ६० वर्षांनी लुटला संगीत नाट्याचा आनंद
By Admin | Updated: January 11, 2016 00:46 IST2016-01-10T22:36:53+5:302016-01-11T00:46:55+5:30
उत्स्फूर्त प्रतिसाद : रमेश टोपले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दुसरा राज्यस्तरीय नाट्य महोत्सव

आजरेकरांनी ६० वर्षांनी लुटला संगीत नाट्याचा आनंद
ज्योतीप्रसाद सावंत --आजरा-अॅक्टिव्ह ग्रुप, सांगलीने सादर केलेल्या ‘संगीत ययाती आणि देवयानी’ या नाट्य प्रयोगाने तब्बल ६० वर्षांनी आजऱ्यातील नाट्य रसिकांनी संगीत नाटकाचा आनंद अनुभवला. नेटक्या सादरीकरणामुळे अॅक्टिव्ह ग्रुपच्या कलाकारांनी नाट्य रसिकांची मने जिंकली. कै. रमेश टोपले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दुसरा राज्यस्तरीय नाट्यमहोत्सव आजरा येथे सुरू आहे. योगेश सोमण यांच्या ‘आनंदडोह’च्या सादरीकरणाने शुभारंभ झालेल्या या नाट्य महोत्सवाची रंगत वाढत आहे.
दूरदर्शन आणि तंत्रज्ञानाने वापरलेल्या चित्रपटाच्या काळात अडीच-तीन तास नाटक पाहताना अनेकजण आढेवेढे घेत नाटकालाच नाक मुरडतात. आजरेकरांनी मात्र भरघोस प्रतिसाद देत तब्बल सव्वा तीन तासांच्या या नाट्य प्रयोगास, कलाकारांच्या प्रतिभेस कडाक्याच्या थंडीत ही उत्स्फूर्तपणे दाद दिली.गौरी पाटील, अमोल पटवर्धन यांनी नाट्य प्रयोगात असणाऱ्या गीतांना आपल्या सुमधुर आवाजाने उचित न्याय, तर दिलाच पण नाटक ऐतिहासिक व पौराणिक असूनही दिग्दर्शकाने अत्यंत समर्थपणे दिग्दर्शनाची उचललेली बाजू, प्रयोगाला साजेशी वेशभूषा, रंगमंच व्यवस्था आणि अमोल पटवर्धन, गौरी पाटील, कल्याणी, पटवर्धन, रवींद्र कुलकर्णी यांनी भूमिकेला दिलेला न्याय, यांमुळे प्रेक्षकांना शेवटचा अंक संपेपर्यंत खिळवून ठेवण्यात निश्चित हा प्रयोग यशस्वी झाला. यातूनच भविष्यात संगीत नाटकांच्या आयोजनाचे धाडस आजऱ्यातील रसिकांसमोर करायला हरकत नाही, असा संदेशही नकळतपणे प्रेक्षक व सादरकर्त्यांकडून संयोजकांपर्यंत जाण्यास मदत झाली आहे.
तोडकर पिता-पुत्रांचे खास सादरीकरण
नाट्यप्रयोग सुरू होण्यापूर्वी आजऱ्यातील ज्येष्ठ कलाकर अजित तोडकर व त्यांच्या स्वरूप आणि आेंकार यांच्यासह केदार सोहनी यांच्या बहारदार गायनाने ‘नवनाट्य’च्या या नाट्य महोत्सवामध्ये निश्चितच रंगत येत आहे.