आजरा ‘पाटबंधारे’चे तीन-तेरा
By Admin | Updated: June 30, 2015 00:22 IST2015-06-29T23:53:22+5:302015-06-30T00:22:03+5:30
विभाजन केले : कामासाठी गडहिंग्लज, गारगोटीला जावे लागणार

आजरा ‘पाटबंधारे’चे तीन-तेरा
ज्योतीप्रसाद सावंत - आजरा -कोल्हापूर जिल्हा पाटबंधारे कार्यालयाचे उत्तर व दक्षिण असे विभाजन करण्यात आले आहे. वास्तविक सदर कार्यालय गडहिंग्लज येथे होणार असतानाच अचानकपणे विभाजन करून दोन्ही कार्यालये कोल्हापूर येथेच ठेवण्यात आली आहेत. तर आजरा येथील पाटबंधारेचा बहुतांशी कारभार गारगोटी व गडहिंग्लजला जोडल्याने तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना पाणी परवान्यासह इतर कामांकरिता गारगोटी व गडहिंग्लजला खेटे मारावे लागणार आहेत.
कोल्हापूर कार्यालयाकडे गडहिंग्लज पाटबंधारे उपविभाग, निढोरी उपविभाग, पंचगंगा पाटबंधारे कोल्हापूर कोडोली व भोगावती पाटबंधारे उपविभाग, राधानगरी असा कार्यभार होता. या विभागाचे उत्तर व दक्षिण असे विभाजन करण्यात आले आहे. या प्रकारात आजरा तालुक्याचा काही भाग गडहिंग्लज तर काही गारगोटीत गेला आहे. यामुळे आजरा येथील पाटबंधारे कार्यालयाचा कर्मचारी आकृतिबंध विस्कटला आहे. १७ जागांपैकी ११ कर्मचारी इतरत्र हलविण्यात येत आहेत तर यामुळे केवळ ६ कर्मचारी शिल्लक राहिले आहेत. नवीन उपविभागामुळे २० बंधाऱ्यापैकी केवळ ५ बंधाऱ्याचा कार्यभार आजरा कार्यालयाकडे ठेवण्यात आला आहे.
चित्री ते ऐनापूरपर्यंतचा भाग आजरा कार्यालयाकडे राहणार आहे. तलाव लघुपाटबंधारे, सर्फनाला व आजरा पाटबंधारे अशी तीन कार्यालये आजरा येथे सुरू राहणार असल्याचे समजते. तलाव लघुपाटबंधारेची शाखा कागदोपत्री सुरू झाली आहे. पण कार्यालय कोठे, अधिकारी कोण , कर्मचारी किती, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.
चांगले काम, नियोजन चांगले, वसुली चांगली अशी परिस्थिती असताना आजरा पाटबंधारे कार्यालयाचे तीनतेरा करण्यात आले आहेत. यातून शासनाला व वरिष्ठ अधिकाऱ्यांना नेमके काय साध्य करावयाचे आहे, हा संशोधनाचा विषय आहे. घाटकरवाडीपासून साळगावपर्यंतच्या शेतकरी वर्गास आता गडहिंग्लज येथे कामासाठी जावे लागणार आहे. मुळातच आहे तो कर्मचारी वर्ग आजरा पाटबंधारे कार्यालयाकरिता अपुरा आहे. त्यातूनही अत्यंत गोपनीयता बाळगत कर्मचाऱ्यांना इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत.
मागणी नाही...
विरोधही नाही..!
पाटबंधारे खात्याचे विभाजन, आजरा तालुक्यातील कार्यभार हलविण्याची मागणी कोणीही केली नाही तरीही हा अट्टहास का ? हा प्रश्न उपस्थित होत असला तरी याला प्रखर विरोधही होत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.