आजरा तालुका : हरपवडेतील मस्जिदीमधून संपूर्ण गावाला होतोय पाणीपुरवठा-
By Admin | Updated: July 10, 2015 00:03 IST2015-07-10T00:03:20+5:302015-07-10T00:03:20+5:30
-महिना रमजानचा सामाजिक सलोख्याचा !

आजरा तालुका : हरपवडेतील मस्जिदीमधून संपूर्ण गावाला होतोय पाणीपुरवठा-
ज्योतीप्रसाद सावंत - आजरा शहरात मुस्लिम बांधवांचे प्रमाण निश्चितच जास्त असल्याने गणेशोत्सव, दसऱ्याप्रमाणेच रमजान देखील सर्वधर्मीयांचा सण बनून राहिला आहे. बहुतांशी समाजबांधव हे हाताच्या पोटावरचे असले, तरीही जास्तीत जास्त पावित्र्य जपत सर्वजण रोजे, इफ्तार पार्ट्या यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांत गुंतले असून पावसाने उघडीप दिल्याने तरुणाईच्या रात्री जागू लागल्या आहेत.
तालुक्यात एकूण १४ मस्जिदी आहेत. त्यापैकी आजरा शहरात १२ आहेत. त्यानंतर हरपवडेत एक व कासारकांडगावमध्ये एक आहे. सर्वच मस्जिदींमध्ये नियमित नमाज पठण होते. तसेच रमजानमध्ये रोजा इफ्तार व तरावीह पठणासाठी मुस्लिम बांधवाचा सहभाग दिसत आहे.
हरपवडे, उत्तूर, कासारकांडगाव, बहिरेवाडीसह ठिकठिकाणी उद्योगधंद्यांच्या निमित्ताने मुस्लिम समाज विखुरला आहे. प्रचंड कष्टाची तयारी असणाऱ्या या समाजातील बहुतांशी लोकांनी ट्रक, वाहन, तांदूळ
व्यापार, गवंडीकाम यासह विविध व्यवसाय जवळ केले आहेत.
नोकरदार वर्गाचे प्रमाण अत्यंत
कमी आहे. आखाती देशात कामधंद्यानिमित्त जाणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे.
हरपवडे (ता. आजरा) येथील मस्जिदीमधून गावाला दोन तास पाणीपुरवठा केला जात असल्याने या मस्जिदीला सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले आहे. हरपवडेमधील मस्जिदीला वेगळा इतिहास आहे. छोट्याशा गावातील मस्जिदीने गावाला पाणी देऊन मानवतेचे दर्शन दिले आहे. त्यामुळे येथील मस्जिद ही सार्वजनिक उपयोगी ठरणारी मस्जिद बनली आहे.
हरपवडे येथे ७० वर्षांपूर्वी मस्जिद बांधली आहे. १९९० मध्ये येथील प्रतिष्ठित नागरिक कलंदर मुल्ला यांच्या पुढाकाराने आणि समाजाच्या सहकार्याने दोन लाख ७० हजारमध्ये मस्जिदीचे नूतनीकरण झाले. कूपनलिकेद्वारे पाण्याची व्यवस्था केली.
मस्जिदीमधून सर्वांसाठी पाणी खुले करण्यासाठी जमातीमध्ये ठराव करण्यात आला आहे. हिंदू संस्कृतीमधील गावातील रासूबाईची जत्रा, दसऱ्याची पालखी, दिवाळी या सर्व सणांमध्ये मुस्लिम बांधवांचा सहभाग असतो. दाऊद मुल्ला, खुदबुद्दीन मुल्ला, शौकत खेडेकर, गुलाब खेडेकर, अब्दुल मुजावर, युसूफ मुजावर, नजबुद्दीन साळगावकर, गुलाब मुल्ला यांच्या पुढाकाराने रमजान ईद व इफ्तार पार्टी साजरी केली जाते.
आजऱ्यात रात्रभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शालेय मुलांसह वयोवृद्धही रोजा करतात. आजरा तालुक्यात सुमारे २५ हजार मुस्लिम समाज आहे.
ईदचा दिवस जसजसा जवळ येईल, तसतसे सणाविषयीचे सर्वधर्मीयांचे औत्सुक्य वाढत आहे. मस्जिदींसह बाजारपेठेतील मुस्लिम बांधवांची वर्दळ वाढली आहे. बाजारपेठाही कपडे, सौंंदर्यप्रसाधने, खिरीचे साहित्य यांनी हळूहळू सजू लागल्या आहेत.
उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळा, हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालयात सद्य:स्थितीत सकाळच्या सत्रातच घेतल्या जात आहेत.
मुस्लिम बांधव मित्रपरिवारासोबत, तर कधी कुटुंबीयांसोबत इफ्तार साजरा करतात. इफ्तारनंतर मात्र शहर गजबजून जाते. २७ वा रोजा काही हिंदूधर्मीय मंडळीही करतात.