शुभम गायकवाड
उदगाव : शिरोळ तालुक्यातील कोरोनाची वाढती संख्या पाहता त्याला प्रतिबंध घालण्यासाठी शासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. मार्चच्या सुरुवातीलाच उदगाव (ता. शिरोळ) येथील कुंजवनमध्ये शिरोळ तालुक्यासाठी कोविड सेंटर उभारण्यात आले. येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रयत्नामुळे सहाशे रुग्णांना याचा फायदा झाला आहे. एकंदरीत उदगावचे कोविड केंद्र तालुक्यासाठी मोठा आधार बनला आहे.
शिरोळ तालुक्यात आजअखेर कोरोना रुग्णांनी सहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला कोरोना रुग्णांची वाढ संथगतीने होती. तद्नंतर जयसिंगपूर परिसरासह उदगाव, चिंचवाड, संभाजीपूर, अब्दुललाट या ग्रामीण भागातही रुग्णांची मोठी वाढ झाली. तालुक्यातील ग्रामीण भागात उदगाव येथे आजपर्यंत अडीचशे रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे गरिबांना परवडणारे शासकीय कोविड सेंटर असावे, अशी मागणी नागरिकांनी केली होती. काही अपवाद वगळता या कोविड सेंटरने रुग्णांना बरे करण्यात यश मिळविले आहे.
आजपर्यंत या केंद्रात ५९० रुग्णांची नोंद असून, त्यापैकी ५१२ रुग्ण बरे झाले आहेत. १५ मृत झाले असून सध्या ६३ रुग्ण उपचार घेत आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी प्रसाद दातार, कोविड केंद्राचे प्रभारी डॉ. महेंद्र कुंभोजकर यांच्यासह डॉक्टर व कर्मचारी अहोरात्र कोरोना प्रतिबंधासाठी प्रयत्न करीत आहेत. येथील कर्मचाऱ्यांनी रुग्णांना उत्तम सेवा दिली आहे. त्याचे कौतुक शिरोळ तालुक्यातील रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत.
-------------------------------
चौकट -
सेंट्रल किचनमधून तीन केंद्रांना जेवण
कुंजवनमधील सेंट्रल किचनमधून उदगाव कोविड सेंटर, आगर कोविड सेंटर व सिद्धिविनायक कोविड सेंटर येथे एकाचवेळी रुग्णांना जेवण व नाष्टा पोहोच होतो. त्यामुळे तालुक्यातील लांब अंतरावर असणाऱ्या नातेवाइकांना याचा लाभ मिळत आहे.
कोट : शिरोळ तालुक्याचे कोविड केंद्र असल्याने येथे सुरुवातीपासून रुग्ण दाखल होत आहेत. त्यांची वेळेवर तपासणी करणे, औषधे पुरविणे, जेवणाची व्यवस्था करणे, ही कामे प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहेत. कोरोना प्रतिबंधासाठी आमचे पथक दिवसरात्र प्रयत्न करीत आहेत.
- डॉ. प्रसाद दातार, तालुका वैद्यकीय अधिकारी