कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या सातव्या माळेला रविवारी श्रीअंबाबाईची त्रिपुरसुंदरी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवीची फलाहार करत असलेल्या रूपातील पूजा बांधण्यात आली. नवरात्रौत्सवात आदिशक्तिपीठ म्हणून आई अंबाबाईसाठी तिरूमला तिरूपती देवस्थानकडून मानाचा शालू आज, सोमवारी अर्पण केला जाणार आहे.दुपारी १२ च्या आरतीनंतर त्रिपुरसुंदरीच्या रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. उगवत्या सूर्याप्रमाणे जिचा वर्ण असून, जिने आपल्या हातामध्ये पाश-अंकुश-पंचबाण व उसाचा धनुष्य धारण केला आहे, असे या देवीचे स्वरूप आहे.
वाचा- आम्ही अंबेचे सेवेकरी: देवीसमोर पायघड्या घालणाऱ्या सेवेकऱ्यांची परंपरापूर्वी भंडासुराच्या अत्याचाराला त्रासलेल्या आणि स्वर्गादी स्वस्थानापासून वंचित झालेल्या देवतांनी, महर्षी नारदांच्या उपदेशानुसार श्रीमहात्रिपुरसुंदरी देवीची घोर तपश्चर्या आरंभली. यामध्ये देवीस उद्देशून देवगण ‘महायाग’ करू लागले. यावेळी प्रसन्न होऊन देवी माघी पौर्णिमेस अग्निकुंडातून प्रगट झाली. ही दशमहाविद्येतील तिसरी देवता असून, ‘ललितेश्वर’ हे तिचे भैरव आहेत. ही श्रीकुलप्रमुख असणारी देवता, पूर्वाम्नायपीठस्था आहे.बाला त्रिपुरसुंदरी, महात्रिपुरसुंदरी, श्रीषोडशीललिता, राजराजेश्वरी, त्रिपुरा, सुभगा, कामेश्वर हिचे उपासनाभेद व प्रकार आहेत. हिच्या उपासनेने सुखभोगलाभ, पीडानिवारण, मुक्तिलाभ, सौभाग्यप्राप्ती, सर्व आध्यात्मिक शक्ती यांचा लाभ होतो. साक्षात शिव, कुबेर, अग्नी, सूर्य, दुर्वास, दत्त, परशुराम इ. हिचे उपासक भक्त आहेत. ही पूजा अजिंक्य मुनिश्वर, सचिन गोटखिंडीकर, अर्चिस चिटणीस आणि रोहन परांडेकर यांनी बांधली.
तिरुपती येथे भेट
- आपली रुसून गेलेली पत्नी मिळावी यासाठी विष्णूने अंबाबाईसमोर १० वर्षे तपश्चर्या केली. प्रसन्न होऊन अंबाबाईने विष्णूला तिरूपती येथे सुवर्णमुखरी नदीकाठी तुझी पत्नी लक्ष्मीची भेट होईल असा आशीर्वाद दिला. त्यानुसार तिरूपती येथे लक्ष्मी-विष्णूची भेट झाली. अशी अख्यायिका आहे.
- अंबाबाईच्या कृपाशीर्वादाने हे घडले. त्यामुळे दरवर्षी नवरात्रौत्सवात तिरूपती देवस्थानकडून देवीला नवरात्रौत्सवात शालू अर्पण केला जातो. आज, सोमवारी तिरूपती देवस्थानचे पदाधिकारी सकाळी सवाद्य मिरवणुकीने देवीला साडी अर्पण करतील.
Web Summary : Tirupati Devasthan will present a sacred shawl to Kolhapur's Ambabai today during Navratri. Ambabai, worshipped as Tripurasundari, received blessings leading to Lakshmi-Vishnu's reunion. This annual offering signifies gratitude for Ambabai's divine grace.
Web Summary : तिरुपति देवस्थान आज नवरात्रि के दौरान कोल्हापुर की अंबाबाई को पवित्र शॉल भेंट करेगा। त्रिपुरसुंदरी के रूप में पूजी जाने वाली अंबाबाई को लक्ष्मी-विष्णु के पुनर्मिलन का आशीर्वाद मिला। यह वार्षिक भेंट अंबाबाई की दिव्य कृपा के प्रति कृतज्ञता का प्रतीक है।