कोल्हापूर : हुतात्मा पार्कमधील ओढयात नालेसफाई करताना पुलाखाली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना गुरुवारी (दि. ४) सकाळी शीर नसलेला पुरुषाचा मृतदेह आढळला. शीर नसल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. आठवड्यापूर्वी खून करून मृतदेह पुलाखाली टाकला असावा किंवा मद्यपीचा पडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात महापालिकेची नाले सफाई मोहीम सुरू आहे. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास हुतात्मा पार्कच्या पिछाडीस सावित्रीबाई फुले हॉस्पिटलजवळ नाले सफाई करताना जेसीबी चालक सतीश प्रकाश गायकवाड (वय ३५, रा. वाकरे, ता. करवीर) यांना पाण्यात मृतदेह आढळला. त्यांनी याची माहिती इतर कर्मचा-यांना दिली. काही वेळाने कर्मचा-यांनी जुना राजवाडा पोलिसांना माहिती दिली. जेसीबीच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी पंचनामा केला.जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्या मदतीने उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सीपीआरमध्ये पाठवण्यात आला. अंदाजे ४० ते ५० वयोगटातील पुरुषाचा मृतदेह असून, त्याच्या अंगावर केवळ अंतरवस्त्र होते. शीर गायब होते, मात्र शरीरावर इतर कुठेही जखमा नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
खून की अपघात?शीर नसलेला मृतदेह आढळल्यामुळे हा खून असावा अशी चर्चा परिसरात सुरू होती. मात्र, मृतदेहावर इतर काहीच जखमा नाहीत. सडल्यामुळे शीर तुटून पाण्यातून वाहून जाऊ शकते, असाही अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे हा खून की अपघात याबाबत स्पष्टता नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
महापालिका अधिका-यांची टोलवाटोलवीओढ्यात मृतदेह आढळताच कर्मचा-यांनी याची माहिती महापालिकेच्या अधिका-यांना कळविली. माहिती देऊन दोन तास उलटले तरी अधिकारी घटनास्थळी फिरकले नाहीत. यामुळे पोलिसांना माहिती देण्यास विलंब झाला. पोलिसांचा ससेमिरा मागे लागू नये यासाठी अधिकारी फिरकले नाहीत, अशी चर्चा कर्मचा-यांमध्ये सुरू होती.