इंदुमती गणेशकोल्हापूर : म्हैसूरपाठोपाठ कोल्हापूरचादसरा महोत्सव जगप्रसिद्ध व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न होत असले तरी याअंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमांना अत्यल्प प्रतिसाद असल्याचा अनुभव गेल्या चार वर्षांत आला आहे. महोत्सवाला लोकोत्सवाचे स्वरूप येणे अपेक्षित असले तरी ठरलेले कार्यक्रम, ठरलेले प्रेक्षक, ठरलेल्या व्यक्ती संस्थांचा सहभाग असा याचा मर्यादित अवाका आहे. त्याची व्याप्ती वाढवायची असेल आणि खरेच कोल्हापूरकरांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घ्यायचा असेल तर महोत्सवाचे स्वरूप बदलून त्याला नाविन्यपूर्ण संकल्पनांची विशेषत: युवावर्गाला सहभागी करून घेण्याची गरज आहे.जिल्हा प्रशासनाच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून कोल्हापुरात नवरात्रौत्सव ते दसरा या काळात दसरा महोत्सवाचे आयोजन केले जाते. म्हैसूरपाठोपाठ कोल्हापुरात असा उत्सव होत असल्याने तो जगप्रसिद्ध व्हावा, याकाळात पर्यटन वाढावे या उद्देशाने याचे आयोजन केले जात असले तरी त्यासाठी खर्च होणारा पैसा, अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यत सगळ्यांचे होणारे प्रयत्न, त्यासाठी लागणारा वेळ, नियोजन आणि त्याला मिळणारा अल्प प्रतिसाद बघता कुठेतरी नियोजन चुकतंय, असेच चित्र आहे.
ठराविक वर्गाचा सहभागदसरा महोत्सव हा शासनाचा, ठराविक वर्गाने ठराविक वर्गासाठी घेतलेला उपक्रम असे स्वरूप झाले आहे. शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक-युवतींसह सर्वसमावेशक कार्यक्रमांचा अभाव जाणवतो. महिलांची रॅली निघते पण ती का कशासाठी हेच कळत नाही, त्यातही ठरलेली कार्यालये, महिला संस्था असतात. पारंपरिक दिवस फक्त कार्यालयांमध्ये साजरा होतो. दसरा चौकात दर्जेदार कार्यक्रम होतात पण दुर्दैवाने खुर्च्या रिकाम्या असतात. अशाच त्रुटी अन्य उपक्रमांमध्ये असतात. आयोजन-नियोजनासाठी मोजकेच लोक धडपडतात. कार्यक्रमांना प्रतिसाद हवा असेल तर मग भवानी मंडप परिसराचा विचार करावा लागेल.
निधीसाठी प्रयत्नप्रशासनाकडे सध्या निधी नसल्याने दसरा महोत्सव समितीने निधीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ब्रँडेड ज्वेलरी शोरूम, सराफ व्यावसायिक, उद्योजक, मोठे हॉटेल व्यावसायिक, व्यापारी अशा व्यक्ती व संस्थांना निधीसाठी आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिसाद न मिळण्याची कारणे
- नवरात्रौत्सवात घराघरांमध्ये घटस्थापना, रोज देवीचे धार्मिक विधी असतात. महिलांचे उपवास, तसेच कठोर नियम पाळले जातात. त्यामुळे या काळात स्थानिक कोल्हापूरकर बाहेर कार्यक्रमांचा आस्वाद घ्यायला जात नाहीत.
- परराज्यांतून आलेले भाविक फक्त एक दिवसासाठी अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात आणि निघून जातात. त्यांना कार्यक्रमांची माहिती नसते, पाहण्यासाठी वेळही नसतो.
- भाविक, पर्यटक तर दूरची गोष्ट स्थानिक कोल्हापूरकरांनादेखील दसरा महोत्सवातील कार्यक्रमांची माहिती नसते.
- दसरा महोत्सवाची आधीपासूनच प्रसिद्धी होत नाही.
- सर्वसमावेशक कार्यक्रमांचा अभाव