गारगोटी : नाधवडे (ता. भुदरगड) येथील मायरा विजय पाटील (वय १५ महिने) या बालिकेचा अचानक मृत्यू झाला.‘तिचं’ वय अवघं पंधरा महिन्यांचं. सदैव हसऱ्या मुखाचं सुंदर गोंड्स रूप. नुकतंच जमीनवरचं रांगण पार करून ‘ती’ घरात दुडूदुडू धावू लागली होती. सुखावून टाकणारे तिचे बोबडे बोल सर्वांनाच भावायचे. त्यामुळे ती सर्वांची आवडती ‘मयू’ बनली होती. २८ डिसेंबरला तिचा पहिला वाढदिवस हौसेनं धूमधडाक्यात साजरा केला होता; पण मृत्यूने चोरपावलांनी येऊन तिला अखेर गाठलं आणि झोपेतच हृदयविकाराच्या झटक्यानं तिचं निधन झाले.जयसिंग पाटील यांचे कुटुंब म्हणजे गोकुळ. दोन्ही मुलांची लग्नं झालेली. धाकट्या विजयच्या संसारवेलीवर पंधरा महिन्यांपूर्वी ‘मायरा’ नावाची कळी उमलली. अलीकडे ती दारात उभं राहून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला आई-बाबा, नाना, काकी अशा बोबड्या बोलानं हाका मारायची. त्यामुळे प्रत्येकजण आपुलकीनं तिला कडेवर उचलून घ्यायचा. मंगळवारचा (दि.२०) दिवस या कुटुंबासाठी मोठं दुःख घेऊन आला.मायराला दूधभात भरवून तिची आई आरतीने तिला झोपवले. आपलं थोडं डोकं गरगरून उलट्या होऊ लागल्याने दवाखान्यात गेली. बराच वेळ झाला; पण मायरा झोपेतून जागी झाली नाही म्हणून आजीने तिला उठविण्याचा प्रयत्न केला; पण ती निपचित पडली होती.
माय-लेकीची शेवटची भेट देखील झाली नाहीतिला तत्काळ दवाखान्यात नेले; पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. तिच्या आईवर ज्या दवाखान्यात उपचार सुरू होते तिथेच लेकीला नेले; पण माय-लेकीची शेवटची भेट देखील झाली नाही. आपली एकुलती लेक या जगाचा निरोप घेऊन गेली आहे, याची पुसटशी कल्पनाही तिला नव्हती.