कोल्हापूर : कळंबा येथील गॅस स्फोटात गंभीर जखमी झालेला प्रज्वल अमर भोजणे (वय साडेपाच वर्षे, रा. मनोरमा कॉलनी, कळंबा) याचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी (दि. १०) दुपारी मृत्यू झाला. २५ ऑगस्ट रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास झालेल्या स्फोटात जखमी झाल्याने त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. त्या घटनेत त्याची आई शीतल आणि आजोबा अनंत सासणे यांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांची संख्या तीन झाली. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जुना राजवाडा पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या स्फोटात शीतल अमर भोजणे (वय २९) त्यांचा मुलगा प्रज्वल, मुलगी इशिका आणि सासरे अनंत भोजणे (वय ६०) गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान २५ ऑगस्टच्या मध्यरात्री शीतल यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आठवड्याने अनंत भोजणे यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी अवस्थेतील प्रज्वल याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.बुधवारी दुपारी चारच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याची साडेतीन वर्षीय बहीण इशिका हिच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, दोन दिवसात तिला डिस्चार्ज मिळेल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. गॅस स्फोटाच्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याने भोजणे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
विधी सुरू असतानाच मृत्यूची माहितीदुर्घटनेत दगावलेल्या शीतल भोजणे आणि अनंत भोजणे यांचा बाराव्याचा विधी करण्यासाठी अमर भोजणे हे बुधवारी नातेवाईकांस नृसिंहवाडी येथे गेले होते. तिथे विधी सुरू असतानाच मुलगा प्रज्वल याचा मृत्यू झाल्याचा फोन त्यांना खासगी रुग्णालयातून आला. या माहितीने त्यांना धक्का बसला.कंपनीच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारावर गुन्हागॅसची पाइपलाइन जोडणी करण्यात त्रुटी राहिल्यामुळेच दुर्घटना झाल्याचे फॉरेन्सिक तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कंपनीचे अधिकारी, ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.