९ तारखेच्या सरपंच मोहिमेची गावात खलबते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:59 IST2021-02-05T06:59:40+5:302021-02-05T06:59:40+5:30
एरवी निवडणूक होण्यापूर्वी सरपंच पदाचे आरक्षण ठरलेले असायचे. मात्र यावेळी निवडणूक निकालानंतर हे आरक्षण काढले गेले आहे. त्यानंतर सरपंच ...

९ तारखेच्या सरपंच मोहिमेची गावात खलबते
एरवी निवडणूक होण्यापूर्वी सरपंच पदाचे आरक्षण ठरलेले असायचे. मात्र यावेळी निवडणूक निकालानंतर हे आरक्षण काढले गेले आहे. त्यानंतर सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर ठरल्या आरक्षणाप्रमाणे पात्र ठरलेल्या उमेदवारांनी आपापली फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. आपापल्या नेतेमंडळींना विश्वासात घेऊन आपलीच वर्णी सरपंच व उपसरपंचपदी लागावी यासाठी धडपड सुरू आहे. अनेकांच्या अर्धांगिनी तथा सौबाई या गावाच्या कारभारणी होणार आहेत. त्यासाठी 'पतिराजां'चीही घालमेल सुरू आहे. गावातील पारावर, चौकातील कट्ट्यावर, थंडीच्या शेकोटीसमोर, कोण, कुठे सरपंच होणार, का होणार, याचीच चर्चा खेड्यापाड्यात रंगत आहे.
निकालानंतर थंड झालेले गावाचे राजकारण आता या सरपंच निवडीच्या निमित्ताने पुन्हा तापले आहे. यामध्ये नेतेमंडळींची थोडीशी कसरत होणार आहे. सरपंचपद खुले असणाऱ्या ठिकाणी एकाला संधी देताना दुसऱ्या इच्छुकाची मनधरणी करावी लागत आहे. अनेकांनी अन्य सदस्यांना विश्वासात घेऊन आपले नाव सरपंच-उपसरपंच पदावर कोरण्यासाठी जोरकस प्रयत्न चालवले आहेत. एकूणच गावाकडे खलबते सरपंच मोहिमेची चालवली जात आहेत.