सराफ संघासाठी ९० टक्के मतदान:
By Admin | Updated: October 10, 2014 00:28 IST2014-10-10T00:21:49+5:302014-10-10T00:28:48+5:30
चुरस : शांततेत, पण ईर्ष्येने मतदान; आज दुपारपर्यंत गुलाल

सराफ संघासाठी ९० टक्के मतदान:
कोल्हापूर : एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांवरून गाजत असलेल्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघासाठी आज, गुरुवारी शांततेत पण ईर्ष्येने ९० टक्के मतदान झाले. ५८० सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. उद्या, शुक्रवारी दुपारी दोन वाजेपर्यंत निवडणुकीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. संघाच्या महाद्वार रोडवरील कार्यालयाच्या हॉलमध्ये सहा बूथवर मतदानाची सोय करण्यात आली होती. आज सकाळी नऊ वाजता मतदानाला सुरुवात झाली. अध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी भगवा, उपाध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी पिवळ्या आणि संचालकपदाच्या उमेदवारांसाठी पांढऱ्या रंगाच्या व्होटिंग स्लिप ठेवण्यात आल्या होत्या. मतदारांनी आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावावर शिक्का मारून ही स्लिप ठेवण्यात आलेल्या बॉक्समध्ये टाकायची होती. दुपारी बारा वाजेपर्यंत चाळीस टक्के मतदान झाले होते. दुपारी तीन वाजेपर्यंत ५८० सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. संघाचे एकूण सातशे सभासद आहेत. त्यांपैकी ६५५ सभासदांना मतदानाचा अधिकार आहे. सत्तरजणांनी मतदानाकडे पाठ फिरविली. सराफ संघाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत माजी अध्यक्ष सुरेश गायकवाड, विद्यमान उपाध्यक्ष संजय खद्रे आहेत. उपाध्यक्षपदासाठी हितेश ओसवाल, गणपतसिंह देवल, राजेश राठोड हे तीन उमेदवार रिंगणात आहेत. संचालकपदाच्या बारा जागांसाठी सुरेश ओसवाल, धर्मपाल जिरगे, शिवराज पोवार, हिंदुराव शेळके, नमित गांधी, सुशीलकुमार गांधी, सुहास जाधव, तेजस धडाम, विपीन परमार, अनिल पोतदार, विजयकुमार भोसले, बाबा महाडिक, जितेंद्र राठोड, नंदकुमार ओसवाल, महेंद्र ओसवाल या सतरा उमेदवारांनी निवडणूक लढविली. मुख्य अधिकारी कांतिलाल ओसवाल यांच्या अध्यक्षतेखालील जवाहर गांधी, विजय वशीकर आणि विजय मालणकर यांच्या समितीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली. उद्या सकाळी नऊ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. आधी १२ संचालकांच्या निवडी जाहीर होतील. त्यानंतर उपाध्यक्ष आणि सर्वांत
शेवटी अध्यक्षपदाचा निकाल लागेल. ही सर्व प्रक्रिया संपायला दुपारचे दोन अडीच वाजतील, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. (प्रतिनिधी)
परिसरात गर्दी... चर्चेत ऊत
महाद्वार रोड, गुजरीत एरव्ही ग्राहकांची मोठी गर्दी असते. आज मात्र हा परिसर सराफ व्यावसायिकांनी गजबजला होता. संघाच्या दारात उमेदवारांसह त्यांचे समर्थक मतदारांच्या गाठीभेटी घेत होते. मतदान केलेले आणि न केलेले सभासद गुजरी परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्या काय निकाल लागेल, कोण निवडून येईल, या चर्चेचा फडच येथेच रंगला होता.
मतदारांना साद...
निवडणुकीच्या रिंग्ांणात असलेल्या उमेदवारांनी उमेदवारी नाव लिहिलेले बिल्ले लावले होते. मतदानासाठी आलेल्या सभासदाला संघाच्या दारातच गाठून आपल्या नावाची स्लिप आणि नंबर देत मलाच मतदान करा, असे सांगत होते. सभासद मात्र सगळ्यांनाच ‘हो-हो’ म्हणत आत जात होते. बाहेर आल्यानंतर मात्र सगळेच गप्पांत रंगल्याचे खेळीमेळीचे चित्र होते.