बाजार समितीसाठी ९०% मतदान
By Admin | Updated: July 13, 2015 00:45 IST2015-07-13T00:44:59+5:302015-07-13T00:45:10+5:30
उद्या मतमोजणी : पी. जी. शिंदे गटाचा मतदानावर बहिष्कार

बाजार समितीसाठी ९०% मतदान
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीसाठी रविवारी किरकोळ बाचाबाची वगळता शांततेत व ईर्र्षेने ८९.६० टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान हमाल-तोलाईदार गटात ९४.५१ टक्के झाले. गगनबावडा तालुक्यात पी. जी. शिंदे गटाने मतदानावर बहिष्कार टाकल्याने विकास संस्था गटात अवघे ५२.३५ टक्के मतदान झाले. मतमोजणी उद्या, मंगळवारी शासकीय धान्य गोदामात होणार आहे.
बाजार समितीसाठी ६२ केंद्रांवर मतदान झाले. सकाळपासून मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. तिरंगी लढतीत नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने निवडणुकीत कमालीची चुरस निर्माण झाली होती. वालावलकर हायस्कूल, प्रिन्स शिवाजी विद्यालय येथे सकाळी अकरापर्यंत सरासरी २० टक्के मतदान झाले होते. कागल, निढोरी येथे दुपारी साडेबारापर्यंत ५५ टक्के मतदान झाले होते. गारगोटी व राधानगरी येथे दुपारी अडीचपर्यंत सरासरी ७८ टक्के मतदान झाले. सायंकाळी पाचपर्यंत मतदानासाठी गर्दी झाली होती.
हमाल-तोलाईदार गटात ईर्षेने ८९३ पैकी ८४४ मतदान झाले. येथे एका जागेसाठी आठजण रिंगणात असून अपक्षांनीही तगडे आव्हान दिल्याने चुरशीचा सामना होत आहे. गगनबावडा तालुक्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते पी. जी. शिंदे यांनी मतदानावर बहिष्कार टाकला. तालुक्यात विकास संस्था गटाचे ८०६ मतदान आहे. त्यापैकी केवळ ४२२ (५२.३५ टक्के) मतदान झाले. ग्रामपंचायत गटातील २०९ पैकी १५२ (७२.७२ टक्के) मतदान
झाले.
एकंदरीत, कोल्हापुरातील अडते-व्यापारी केंद्रावर बाचाबाचीचे प्रकार वगळता इतरत्र मतदान शांततेत पार पडले. (प्रतिनिधी)
अशी होणार मतमोजणी
शासकीय धान्य गोदामात उद्या, मंगळवारी सकाळी आठपासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे. एकूण २८ टेबलांवर मोजणी केली जाणार असून, पहिल्यांदा विकास संस्था गटातील २८ केंद्रांची एकदम मोजणी होणार आहे. त्यानंतर ग्रामपंचायत गटाची मोजणी पूर्ण केली जाणार असून, त्यानंतर अडते-व्यापारी, हमाल-तोलाईदार, पणन प्रक्रिया संस्था या क्रमाने मोजणी केली जाणार आहे. यासाठी शंभर कर्मचारी नियुक्त केले असून साधारणत: दुपारी चारपर्यंत मोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंग यांनी दिली.
पडळ केंद्रावर
१०० टक्के मतदान !
पडळ केंद्रावर १३ ग्रामपंचायत सदस्यांचे मतदान झाले. येथे
सर्वच्या सर्व १११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.