अडीच महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत ९ कोटी ७६ लाख जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:16 IST2021-06-23T04:16:52+5:302021-06-23T04:16:52+5:30
कोल्हापूर : महापालिकेच्या तिजोरीत अडीच महिन्यांत ९ कोटी ७६ लाख रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत १३ ...

अडीच महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत ९ कोटी ७६ लाख जमा
कोल्हापूर : महापालिकेच्या तिजोरीत अडीच महिन्यांत ९ कोटी ७६ लाख रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत १३ कोटी ७५ लाख रुपयांचा घरफाळा गोळा झाला होता. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने यावर्षी व्यापारी, व्यावसायिकांनी घरफाळा भरण्याकडे काही प्रमाणात दुर्लक्ष केले आहे. यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यावेळी घरफाळ्याची रक्कम कमी जमा झाली आहे; पण सहा टक्के सवलत योजनेस आणखी आठवडाभराचा कालावधीत शिल्लक आहे. या कालावधीत आणखी घरफाळा संकलित होईल, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
संपूर्ण घरफाळा रक्कम ३० जून २०२१ पूर्वी भरल्यास ६ टक्के सूट देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या सहाही नागरी सुविधा केंद्रावर मालमत्ताधारकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेच्या तिजोरीत १ एप्रिल ते १५ जून २०२१ अखेर ९ कोटी ७६ लाख रुपये जमा झाले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावेळी ३ कोटी ९९ लाख रुपये कमी संकलित झाले आहेत. गेल्यावर्षी या कालावधीत दंडाची थकीत घरफाळा २ कोटी १९ लाख जमा झाला होता. यावेळी २ कोटी ४७ लाख रुपये थकीत घरफाळा गोळा झाला आहे. गेल्यावर्षाच्या तुलनेत यावेळी थकीत घरफाळा २८ लाखांनी अधिक गोळा झाला आहे. यावरून पहिल्यांदा थकीत घरफाळा भरू, नंतर नियमित भरू, असे मालमत्ताधारकांची मानसिकताही समोर येते.
दरम्यान, महापालिकेतर्फे संकेतस्थळावर मिळकत कराची देयके अपलोड करण्यात आली आहेत. लॉकडाऊनमुळे प्रिटिंगसाठी कागद वेळेवर उपलब्ध न झाल्याने बिल छपाईस विलंब होत आहे. यामुळे करदात्यांना घरपोच बिले वेळेत उपलब्ध होऊ शकणार नाहीत. त्यामुळे या ६ टक्के सवलतीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या वेबसाईटवर आपला करदाता क्रमांक टाकून बिल पहावे.
नियमित कर भरणाऱ्या मिळकतधारकांनी मागील वर्षाचे प्राप्त झालेले बिल सोबत आणावे, अथवा आपला करदाता क्रमांक सांगितल्यास तत्काळ आपल्याला आपला चालू वर्षाची घरफाळ्याची रक्कम समजू शकेल. कोरोनामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाइन घरफाळा भरावा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.