शिक्षक बँकेसाठी ९७.३९ टक्के मतदान
By Admin | Updated: April 4, 2015 00:28 IST2015-04-04T00:21:01+5:302015-04-04T00:28:52+5:30
आज फैसला : बँकेच्या इतिहासात सर्वाधिक मतदान; उच्चांकी मतदान शिरोळ व कागल तालुक्यांत

शिक्षक बँकेसाठी ९७.३९ टक्के मतदान
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेसाठी चुरशीने ९७.३८ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान शिरोळ व कागल तालुक्यांत ९८.९६ टक्के झाले असून, मतमोजणी शनिवारी (दि. ४) होत आहे. साधारणत: दुपारी चारपर्यंत संपूर्ण निकाल अपेक्षित आहे. बॅँकेच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने सर्वांचे धाबे दणाणले आहे.
शिक्षक बँकेसाठी राजाराम वरूटे यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ शिक्षक संघ पॅनेल, प्रसाद पाटील व कृष्णात कारंडे यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेल व एस. व्ही. पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी पॅनेल अशी निकराची व प्रतिष्ठेची तिरंगी लढत झाली. गेले आठ-दहा दिवस प्रचारातील आरोप-प्रत्यारोपांनी सारे शिक्षणक्षेत्र ढवळून निघाले. शुक्रवारी बारा तालुक्यांतील वीस केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच मतदानासाठी कमालीचा उत्साह जाणवत होता. तिन्ही पॅनेलनी तालुकानिहाय मतदारांना केंद्रापर्यंत पोहोचविण्याची सोय केली होती. पाच-सहा गावांतील शिक्षकांना एकत्रित करून तेथून मतदान केंद्रांवर आणले जात होते, तर काही मतदारांनी स्वत:च्या गाडीतून येऊन मतदान करणे पसंत केले. सर्वाधिक १०४८ मतदान असलेल्या करवीर तालुक्याचे मतदान वि. स. खांडेकर विद्यालयात झाले. येथे तीन केंद्रांत १२ बुथ मतदानासाठी तयार केल्याने गतीने मतदान झाले. सकाळपासून एकदाही मतदान केंद्राबाहेर रांग पाहावयास मिळाली नाही. दुपारी एक वाजता पन्हाळा तालुक्यात सर्वाधिक ८८ टक्के मतदान तर जिल्ह्यात सरासरी ६८ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी पाचपर्यंत ६८२२ पैकी ६६४४ मतदान (९७.३९ टक्के) झाले.
दरम्यान, शनिवारी सकाळी आठ वाजता रमणमळा येथील शासकीय गोदामात मतमोजणीस सुरुवात होणार आहे. २५ टेबल वर मतमोजणी होणार असून प्रत्येक टेबलवर
दोन असे ७५ कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. मतपत्रिकांची विभागणी केल्यानंतर पहिल्यांदा महिला गटातील मतमोजणी सुरू केली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील शिरापूरकर व प्रदीप मालगावे यांनी दिली. (प्रतिनिधी)
कागलला स्थानिक राजकीय संदर्भ
प्राथमिक शिक्षक बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत
कागल तालुक्यामध्ये चुरशीच्या वातावरणात शुक्रवारी मतदान झाले. येथील हिंदुराव घाटगे विद्यामंदिर शाळेमध्ये मतदान केंद्र होते. तिन्ही पॅनेलचे समर्थक मोठ्या संख्येने खर्डेकर चौकात जमा झाले होते. तालुक्यातील ५७३ मतदारांपैकी ५६७ इतक्या मतदारांनी मतदानाचा
अधिकार बजावला.
शिक्षकांच्या बॅँकेत राजकीय पक्षांचे संदर्भ नसले तरी कागल तालुक्यामध्ये शिक्षकांच्या या आघाड्यांची राजकीय गटानुसार विभागणी झाल्याचे स्पष्ट झाले. मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते भैया माने हे मतदान केंद्राजवळ सत्ताधारी पॅनेलच्या बुथजवळ थांबले होते. त्यानंतर समविचारी पॅनेलच्या समर्थकांनी संजय घाटगे यांच्याशी संपर्क साधला व काही वेळातच अंबरिष घाटगे त्या ठिकाणी आले.
विभागणी वेळीच निकाल स्पष्ट
सोळा मतपत्रिकांचे विभागीकरण झाल्यानंतर तालुका प्रतिनिधींसह राखीव (महिलावगळता) गटातील चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होणार आहे.
त्यामुळे मतपत्रिकेच्या विभागीकरणानंतर मोजणीचे काम गतीने होणार आहे.
शाहूवाडीत गाड्या, नाष्ट्याची व्यवस्था
प्राथमिक शिक्षक बॅँकेच्या निवडणुकीसाठी शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर केंद्रावर उत्साहात आणि चुरशीने मतदान झाले. ५३७ पैकी ४९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ९२.९२ टक्के एवढे मतदान झाले. सकाळपासूनच उमेदवार व कार्यकर्ते मतदानस्थळी रुमाल, टोप्या घालून होते. खास मतदारांना आणण्यासाठी गाड्या व नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती.५३७ पैकी पाच मृत तर उर्वरित मतदार स्पर्धा परीक्षा, जिल्हा बदलीने बाहेरगावी गेल्याने इतर तालुक्यांपेक्षा कमी मतदान झाले.
मतपत्रिकेवर शाई सांडल्यामुळे तणाव
शिक्षक सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी शिरोळमध्ये ६७९ पैकी ६७२ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी आठ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. मतपत्रिकेवर शाई सांडल्यामुळे उमेदवारांच्यात तणाव निर्माण झाल्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया स्थगित करण्यात आली; पण तत्काळ मतपत्रिका उपलब्ध केल्यामुळे पुन्हा मतदानास सुरुवात झाली. शिरोळ तालुक्यातून एकूण ६७९ मतदारांपैकी ६७२ मतदारांनी आपला हक्क बजावला.