‘कुंभी-कासारी’साठी ८६ टक्के मतदान
By Admin | Updated: December 28, 2015 01:13 IST2015-12-28T01:11:16+5:302015-12-28T01:13:49+5:30
शांततेत पण चुरशीने : आमदार चंद्रदीप नरके, बाजीराव खाडेंसह दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद, उद्या फैसला

‘कुंभी-कासारी’साठी ८६ टक्के मतदान
कोपार्डे : कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या २० जागांसाठी रविवारी अत्यंत शांततेत, पण तितक्याच चुरशीने २२,७२७ पैकी १९६५४ (८६.४८ टक्के) मतदान झाले. २० जागांसाठी ५२ उमेदवार रिंगणात होते. कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके, ‘कुंभी बचाव मंच’चे प्रमुख बाजीराव खाडे यांच्यासह दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. विरोधकांमधील फुटीमुळे काहीशा एकतर्फी झालेल्या या लढतीत उत्स्फूर्तपणे मतदान झाल्याने निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. उद्या, मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून कोल्हापुरातील रमणमळा, कसबा बावडा येथील शासकीय बहुुउद्देशीय हॉल येथे मतमोजणी होणार आहे.
‘कुंभी’च्या निवडणुकीत आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ ‘नरके पॅनेल’ व बाजीराव खाडे यांच्या नेतृत्वाखालील ‘राजर्षी शाहू कुंभी बचाव मंच’ अशी सरळ दुरंगी लढत झाली. सत्तारूढ गटाविरोधात एकास एक लढत देण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न झाला; पण ऐनवेळी अनपेक्षितपणे मातब्बर विरोधकांनी रिंगणातून माघार घेतल्याने बाजीराव खाडे यांनी एकाकी झुंज दिली. नरके पॅनेलने आक्रमकपणे प्रचार यंत्रणा राबवीत थेट सभासदांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. ‘विरोधी बचाव मंच’ने ऐनवेळी पॅनेलची बांधणी करूनही प्रस्थापितांना चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केला. रविवारी सकाळी आठ वाजता १०५ केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली. सकाळच्या टप्प्यात एकदम धिम्या गतीने सुरू असणारे मतदान पाहून ५० टक्के तरी मतदान होते की नाही, असे वाटत होते; पण दुपारी बारानंतर मतदानास वेग आला. अडीचपर्यंत सरासरी ७४ टक्के मतदान झाले. गट क्रमांक १ व २ मध्ये मोठी मतदान संख्या असणाऱ्या गावात दुपारनंतर मतदारांच्या रांगा दिसत होत्या. मतदान केंद्राबाहेर बूथवर दोन्ही गटांच्या समर्थकांची गर्दी दिसत होती. गट क्रमांक १ मधील कुडित्रे, वाकरे, कोपार्डे या मोठ्या गावांत चुरशीने मतदान झाले. सर्वाधिक वाकरे येथे ९१.०५ तर कोपार्डेत ८९ टक्के मतदान झाले. गट क्रमांक २ मध्ये सांगरूळ, कसबा बीड, शिरोली दुमालासह बारा वाड्यांचा समावेश होतो. या गटातून ‘बचाव मंच’चे बाजीराव खाडे रिंगणात उतरले आहेत. तरीही या गटात ८५.३२ टक्के मतदान झाले. सांगरूळमध्ये ९० टक्के, तर सावरवाडीत ९०.७४ टक्के मतदान झाले. गट क्रमांक ३ मध्ये ८७.३६ टक्के मतदान झाले. येथे कोगेमध्ये ९२.१३ टक्के, तर खुपिरे येथे ८८.४९ टक्के मतदान झाले. गट क्रमांक ४ मध्ये ८६.४१ टक्के मतदान झाले. यामध्ये कसबा ठाणेमध्ये ९१ टक्के, तर यवलूज मध्ये ९०.१३ टक्के मतदान झाले. गट क्रमांक ५ मध्ये ८६.८५ टक्के मतदान झाले. या गटात वाड्या-वस्त्यांसह गावांची संख्या जास्त असली तरी आमदार चंद्रदीप नरके यांची उमेदवारी या गटातून असल्याने येथे नेहमीच चांगले मतदान होते. आमदार नरके यांच्याशिवाय या गटात प्रकाश दत्तात्रय पाटील व प्रकाश दौलू पाटील हे नरके पॅनेलमधून, तर ‘बचाव मंच’तर्फे ‘कुंभी’चे माजी उपाध्यक्ष वैकुंठनाथ भोगावकर व जिल्हा बॅँकेचे माजी संचालक संदीप नरके अपक्ष म्हणून नशीब अजमावत आहेत.
नरके बंधंूनी केले बोरगावमध्ये मतदान
आमदार चंद्रदीप नरके, कुंभी बॅँकेचे अध्यक्ष अजित नरके, ‘गोकुळ’चे संचालक अरुण नरके व अपक्ष उमेदवार संदीप नरके यांनी बोरगाव
(ता. पन्हाळा) येथे मतदान केले.
‘बचाव मंच’चे प्रमुख बाजीराव खाडे, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांनी सांगरूळमध्ये, तर ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शिरोली दुमाला, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विमल पाटील, पुंडलिक पाटील यांनी आमशी येथे मतदान केले.
संदीप नरकेंच्या शुभेच्छा!
वाकरे (ता. करवीर) येथील मतदान केंद्रावर आमदार चंद्रदीप नरके व संदीप नरके हे समोरासमोर आले. संदीप नरके यांनी उपस्थित उमेदवारांना शुभेच्छा दिल्याने दोघा बंधंूमध्ये स्मितहास्य झाले; पण नजरानजर झाली नाही.