जिल्ह्यात ८५ रुग्णांना ‘स्वाइन फ्लू’
By Admin | Updated: August 28, 2015 00:58 IST2015-08-28T00:58:57+5:302015-08-28T00:58:57+5:30
आरोग्य यंत्रणा सतर्क : आठ महिन्यांत २३ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात ८५ रुग्णांना ‘स्वाइन फ्लू’
कोल्हापूर : वातावरणाच्या परिणामामुळे जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रसार वाढत चालला आहे. जिल्ह्यात १९१ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये ८५ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, २३ रुग्ण मृत झाले आहेत. गेल्या आठ महिन्यांतील ही आकडेवारी आहे.त्यांमध्ये कोल्हापूर १५, सांगली ३, रत्नागिरी ३ अशी आकडेवारी आहे. या साथीला रोखण्यासाठी शासकीय पातळीवर आरोग्य यंत्रणा सतर्क असून, ग्रामीण भागात ७३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १६ ग्रामीण रुग्णालये व ४ उपजिल्हा रुग्णालयांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांची तपासणी व उपचारांच्या सुविधा दिल्या जात आहेत, अशी माहिती ‘सीपीआर’चे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एस. साठे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
वातावरणातील बदलामुळे राज्यात तसेच तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि शेजारील राज्यांमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. राज्यात नागपूर, पुणे, नाशिक, मुंबई, औरंगाबादसह अन्य ठिकाणी स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १ जानेवारी ते २६ आॅगस्ट २०१५ अखेर १९१ संशयित रुग्ण मिळून आले आहेत. त्यांपैकी ८५ रुग्णांना ‘फ्लू’ची लागण झाली आहे.
या रुग्णांवर शासकीय व खासगी रुग्णालयांत उपचार सुरू असताना त्यामध्ये २१ रुग्ण मृत झाले आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही भीती दूर करण्यासाठी तसेच स्वाइन फ्लूपासून बचाव करण्यासाठी शासकीय पातळीवर घरोघरी जाऊन प्रबोधन करण्यात येत आहे. बसस्थानक, रेल्वेस्थानक, शाळा-महाविद्यालये, वसतिगृहे, बाजार, सिनेमागृहे, आदी ठिकाणी ‘स्वाइन फ्लू’ची लक्षणे व घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. रुग्णांना उपचारांसाठी दाखल करण्यासाठी १०८ फोन क्रमांकावर रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. जिल्ह्णातील ५० ते १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांत उपचाराची सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
‘स्वाइन फ्लू’च्या औषधांचा तुटवडा येऊ नये यासाठी जिल्ह्यातील २२ खासगी औषध दुकानांना मान्यता देण्यात आली आहे. तसेच सीपीआर येथे स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याचे डॉ. साठे यांनी यावेळी सांगितले. बैठकीस जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र आडकेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. पी. देशमुख, कोल्हापूर मंडळाचे उपसंचालक डॉ. आर. बी. मुगडे उपस्थित होते.
या ठिकाणी चोवीस तास उपचार
प्राथमिक आरोग्य केंद्र गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड, आजरा, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, कागल, शिरोळ, करवीर व गगनबावडा, इचलकरंजी येथील आय. जी. एम. रुग्णालय, महापालिका क्षेत्रात आयसोलेशन रुग्णालय, अॅपल सरस्वती, अॅस्टर आधार, सिद्धिविनायक, मोरया, स्वस्तिक व डी. वाय. पाटील, आदी रुग्णालयांत संशयित ‘स्वाइन फ्लू’ रुग्णांची तपासणी, नमुने घेणे, औषध उपचार करण्याची चोवीस तास सोय करण्यात आली आहे.