कोल्हापुरात शिक्षकांच्या ८१७ जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:35 IST2020-12-14T04:35:51+5:302020-12-14T04:35:51+5:30
कोल्हापूर : शिक्षण क्षेत्रातील खेळखंडोबा संपत नसल्याची परिस्थिती अजूनही कायम असून कोल्हापूर जिल्ह्यात बाराही तालुक्यांत ८१७ प्राथमिक शिक्षकांच्या जागा ...

कोल्हापुरात शिक्षकांच्या ८१७ जागा रिक्त
कोल्हापूर : शिक्षण क्षेत्रातील खेळखंडोबा संपत नसल्याची परिस्थिती अजूनही कायम असून कोल्हापूर जिल्ह्यात बाराही तालुक्यांत ८१७ प्राथमिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत; तर ज्यांच्या नियंत्रणाखाली कामकाज करायचे, त्या मुख्याध्यापकांच्याही ५६ जागा अजून भरलेल्या नाहीत.
एकीकडे प्राथमिक शाळा आणि शिक्षकांवर वेगवेगळ्या प्रकारच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकल्या जात असताना, पुरेसे शिक्षक देण्यासाठी मात्र शासनाचे दुर्लक्ष होत आहे. ही परिस्थिती गेली काही वर्षे कायम असून, या क्षेत्राविषयी शासनाची अनास्था का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
--------------------------------------------------------------
महास्वच्छता अभियानात तीन टन कचरा उठाव
कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये तीन टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. मोहिमेचा ८५ वा रविवार असून सामाजिक संघटना, एनएसएसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम झाली. यावेळी आयटीआय मेनरोड ते शासकीय मध्यवर्ती कारागृह मेनरोड, खानविलकर पेट्रोल पंप ते सीपीआर चौक, रंकाळा चौक ते फुलेवाडी पेट्रोल पंप, मार्केट यार्ड मेनरोड, सीपीआर चौक ते शुगरमिल चौक, डीएसपी चौक ते भगवा चौक या परिसरात स्वच्छता करण्यात आली.
--------------------------------------------------------------
आटपाडीतील अपहाराची ३० टन साखर हस्तगत
सांगली : राजेवाडी (ता. आटपाडी) येथील सदगुरू साखर कारखाना येथील गौतम शुगर कंपनीची २६ लाख ९६ हजार १४६ रुपयांची अपहार केलेली ३० टन साखर व ट्रक स्थानिक गुन्हे अन्वेेषण शाखेच्या पथकाने जप्त केला. याप्रकरणी अनिल शरणाप्पा माळी (वय २१), विकास शिवाज भोसले (३५, दोघेही रा. मळणगाव, ता. कवठेमहांकाळ) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. बलगवडे (ता. तासगाव) येथे ही कारवाई करण्यात आली.
गौतम शुगर ट्रेडिंग कंपनीची ३० टन साखर पुणे येथील ब्रिटानिया कंपनीत पाेहोच करायची होती. मात्र, तिथे साखर न पोहोचवता ट्रक मालक व चालकाने परस्पर साखरेचा अपहार केला होता. याप्रकरणी तुषार मेहता यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली होती.
--------------------------------------------------------------
लोकअदालतीत 12 कोटींची थकबाकी वसूल
सातारा : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश राजेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये ९९२९ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १०५२ प्रकरणात तडजोड झाली असून, त्यातून तब्बल १२ कोटी १३ लाख ९० हजार १६२ रुपयांची थकबाकी वसूल झाली.
--------------------------------------------------------------
मुख्यमंत्र्यांना कोकणसाठी वेळ कधी मिळणार : नातू
चिपळूण (जि.रत्नागिरी) : निसर्ग वादळावेळी एकदाही न फिरलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकदाचे जिल्हा दौऱ्यावर आले, पण कोकणसाठी त्यांच्याकडे वेळच नव्हता. कोयना धरणाच्या आधुनिकीकरणाची अशी कुठची गरज भासली की त्यांना धावता दौरा करावा लागला, अशी तीव्र प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
--------------------------------------------------------------
ढगाळ वातावरण, पावसाचा आंबा पिकावर परिणाम
देवगड (जि.सिंधुदुर्ग): अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकण किनारपट्टीवरती पावसाचे सावट ओढले आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात काही गावांमध्ये रिमझिम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. ढगाळ वातावरण असल्याने सततच्या हवामानातील बदलाचा परिणाम आंबा पिकावरती होणार आहे.
आलेल्या मोहोरावरती पाऊस पडल्याने बुरशी व किटकाचे साम्राज्य वाढण्याची शक्यात नाकारता येत नाही. यामुळे यावर्षी सुरुवातीला अल्प प्रमाणात आलेला मोहोर उष्ण व दमट हवामान, रिमझिम पावसामुळे टिकविणे शेतक-यांसमोर एक कसोटीच निर्माण झाली आहे.
--------------------------------------------------------------
पाणी उष्टे केल्याने मुलीला मारहाण
मालवण (जि.सिंधुदुर्ग): पुण्याहून मालवणात पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटक कुटुंबातील लहान मुलीने पाण्याची बॉटल तोंडाला लावून पाणी उष्टे केल्याच्या रागातून पर्यटक नवरा-बायकोमध्ये झालेल्या वाद झाला.
या वादातून महिलेने आपल्याच मुलीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याची घटना मालवण पेट्रोल पंप समोरील मुख्य रस्त्यावर घडली. हा सारा प्रकार पाहणाऱ्या स्थानिक नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेत त्या लहान मुलीची सुटका करीत त्या पर्यटक दाम्पत्याला फैलावर घेत चांगलाच चोप दिला.