घरकुल योजनेसाठी हवेत ८१.५० कोटी

By Admin | Updated: August 13, 2014 23:34 IST2014-08-13T22:49:26+5:302014-08-13T23:34:37+5:30

महासभेत चर्चा : हार्डशीपला मुदतवाढ

81.50 crores in the air for the crib scheme | घरकुल योजनेसाठी हवेत ८१.५० कोटी

घरकुल योजनेसाठी हवेत ८१.५० कोटी

सांगली : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरकुलासाठी जादा ८१.५० कोटीची आवश्यकता आहे. घरकुल योजना पूर्ण करण्यासाठी शासनाकडे नव्याने प्रस्ताव पाठविला जाणार असून, त्यावर येत्या २० रोजी होणाऱ्या महासभेत चर्चा होणार आहे. याशिवाय हार्डशीप योजनेलाही ३१ मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ दिली जाणार आहे.
महापालिकेची सभा महापौर कांचन कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, २० रोजी होत आहे. केंद्र शासनाने झोपडपट्टीमुक्त शहर योजनेसाठी सांगली महापालिकेला ९५ कोटींचा निधी दिला होता. या योजनेतून सांगली, मिरज आणि कुपवाड या हद्दीतील ३७९८ झोपडपट्टीधारकांना घरे दिली जाणार आहेत. सध्या मिरजेतील एक व सांगलीतील बाल हनुमान टप्पा क्रमांक एकचे काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित चार ते पाच ठिकाणचे काम एक तर बंद आहे अथवा संथगतीने सुरू आहे. या योजनेच्या पूर्ततेसाठी आणखी ८१.५० कोटींची आवश्यकता आहे. पालिकेची आर्थिक स्थिती पाहता जादा निधी शासनानेच द्यावा, अशी अपेक्षा आहे.
शहरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी पालिकेने २०११ मध्ये हार्डशीप प्रिमियम योजना लागू केली. या योजनेला विकसकाकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे योजनेला ३१ मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा विषयही महासभेत चर्चेला आणला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 81.50 crores in the air for the crib scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.