चोरीच्या धंद्यासाठी केली ८० हजारांची गुंतवणूक

By Admin | Updated: August 5, 2014 00:07 IST2014-08-04T22:59:36+5:302014-08-05T00:07:30+5:30

सर्वकाही सोनसाखळीसाठी : चोरी करून पसार होण्यासाठी छोटा हत्ती विकून घेतली नवीकोरी पल्सर

80,000 invested for stolen business | चोरीच्या धंद्यासाठी केली ८० हजारांची गुंतवणूक

चोरीच्या धंद्यासाठी केली ८० हजारांची गुंतवणूक

दत्ता यादव -- सातारा  ,, आतापर्यंत असं समजलं जात होतं की, चोरीसाठी कसल्याही भांडवलाची गरज काय? मात्र, काळ बदललाय. आताच्या आधुनिक जमान्यात चोरीच्या धंद्यासाठी मोठी गुंतवणूकही करावी लागते, याचेच एक उदाहरण समोर आले आहे. खटाव तालुक्यातील एका अवलीयाने आपली चारचाकी गाडी विकून चक्क सोनसाखळी चोरीसाठी तब्बल ८० हजार रोख देऊन पल्सर खरेदी केली. पण हाय, चोरीचा श्रीगणेशा केल्यानंतर काही तासांतच त्याचे बिंग फुटल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये तीन युवक संशयितरीत्या फिरत आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या टीमला तेथे तत्काळ रवाना केले. तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संदीप मारुती उमापे (वय १९), गणेश लक्ष्मण भोंडवे (वय २३), विशाल शशिकांत भोंडवे (वय १८, सर्व रा. लाडेगाव, ता. खटाव) अशी त्यांनी नावे सांगितली. या तिघांकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली असता त्यांच्याकडून एक-एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली. गणेश हा या टोळीचा मुख्य सूत्रधार. त्याने काही वर्षांपूर्वी व्यवसायासाठी छोटा हत्ती टेम्पो विकत घेतला होता. गावातून तो काही वेळेस वडापही करत होता. छोटे-मोठे भाडे मारून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. मात्र काही वेळेस दिवसभर टेम्पोला भाडे मिळत नव्हते. त्यामुळे त्याने एक आगळावेगळा निर्णय घेतला. टेम्पो विकून त्याने चक्क पल्सर विकत घेतली. यासाठी त्याने रोख ८० हजार रुपयांची रक्कम मोजली. नवीन गाडी घरात आल्याने त्याने गाडीचे पूजनही केले.
दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे शुक्रवारी नागपंचमी दिवशी त्यांनी चोरी करण्यास प्रारंभ करण्याचे ठरविले. महामार्गावरून तिघे उंब्रजला गेले. उंब्रजवरून परत सावज हेरत साताऱ्याकडे यायला निघाले. कोर्टी, ता. कऱ्हाड येथील अनुसया जयसिंग यादव (वय ६५) या सर्व्हिस रस्त्यावरून जात असताना या बहाद्दरांनी त्यांच्या गळ्यातील तब्बल दोन तोळ्यांचे मंगळसूत्र हिसका मारून हिसकावून नेले. काहीही काम न करता केवळ एका सेकंदात साठ हजार रुपये मिळाल्याने (दोन तोळ्यांचे मंगळसूत्र) त्यांचा पहिला डाव यशस्वी झाला. त्या आनंदातच ते थेट घरी गेले. आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी त्या रात्री ‘ओली’ पार्टी केली. तिसऱ्या दिवशी पुन्हा हे बहाद्दर सावज हेरायला घराबाहेर पडले. औद्योगिक वसाहतीमध्ये मोटारसायकलवरून हे तिघे येरझाऱ्या मारत होते. याचवेळी ते पोलिसांना सापडले.
संदीप उमाप हा पदवीधर आहे तर गणेश भोंडवे पाचवी आणि विशाल भोंडवे हा नववीपर्यंत शिकला आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठीच चोरीचा मार्ग पत्करला असल्याचे त्यांनी पोलिसांपुढे कबूल केले. चोरीच्या धंद्यात जम बसण्यापूर्वीच या नवख्या टोळीचा छडा लावण्यात यश आल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलीस उपनिरीक्षक ए. ए. चिंचकर, एस. बी. मदने, हवालदार पी. एच. घोरपडे, संजय पवार, कांतिलाल नवघणे, पी. ए. फडतरे, एन. एम. भोसले, वाय. डी. पोळ, एम. एल. नाचण, एम. बी. शिंदे, व्ही. जे. पिसाळ, एन. व्ही. शेळके, एम. बी. मुलाणी, संजय जाधव या कर्मचाऱ्यांनी या टोळीचा छडा लावला.

Web Title: 80,000 invested for stolen business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.