‘करमणुकी’साठी ८०० कोटींचे उद्दिष्ट
By Admin | Updated: June 3, 2015 00:59 IST2015-06-03T00:39:14+5:302015-06-03T00:59:59+5:30
करमणूक कर : शासनाकडून विभागनिहाय उद्दिष्ट निश्चित

‘करमणुकी’साठी ८०० कोटींचे उद्दिष्ट
राम मगदूम - गडहिंग्लज -गतवर्षी राज्यात ७२५ कोटी करमणूक कर वसुलीचे उद्दिष्ट होते. मात्र, प्रत्यक्षात ७२५ कोटी ८१ लाख इतकी विक्रमी वसुली झाली. वसुलीचे प्रमाणे १००.८१ टक्के इतके आहे. त्या अनुषंगाने यंदा ८०० कोटी वसुलीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पुणे विभागाचे १९५ कोटी, तर कोल्हापूर जिल्ह्याचे उद्दिष्ट ११ कोटी ७५ लाख इतके आहे.
गतवर्षात राज्यातील विविध जिल्ह्यांत करण्यात आलेल्या करमणूक शुल्क वसुलीच्या प्रमाणात तसेच करमणूक केंद्राच्या संख्येच्या अनुषंगाने वसुलीची क्षमता लक्षात घेऊन यावर्षीच्या वसुलीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
राज्यात सर्वाधिक ४४३ कोटी वसुलीचे उद्दिष्ट कोकण विभागाचे, तर सर्वांत कमी २२ कोटी वसुलीचे उद्दिष्ट अमरावती विभागाचे आहे. व्हिडीओ गेम्स, चित्रपटगृह, नाट्यगृह, विविध मनोरंजन व करमणूक कार्यक्रमांच्या परवानगीसाठी आकारले जाणारे शुल्क आणि दूरचित्र वाहिन्यांच्या केबल नेटवर्कसाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्काचा यामध्ये समावेश आहे.
विभागनिहाय उद्दिष्टांमध्ये कोणताही बदल न करता आवश्यकतेनुसार जिल्हानिहाय उद्दिष्टांमध्ये बदल करण्याचे अधिकार संबंधित विभागीय आयुक्तांना प्रदान करण्यात आले आहेत. उद्दिष्टपूर्तीचा अहवाल दरमहा ५ तारखेपूर्वी विहित विवरणपत्रात शासनास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यंदाचे विभागनिहाय उद्दिष्ट असे
२०१५-१६ या आर्थिक वर्षातील विभागनिहाय करमणूक शुल्क उद्दिष्ट असे - कोकण विभाग - ४४३ कोटी, पुणे विभाग - १९५ कोटी, नाशिक विभाग - ५५ कोटी, अमरावती विभाग - २२ कोटी, नागपूर विभाग - ३५ कोटी, औरंगाबाद विभाग - ५० कोटी.
कोल्हापूर ११.७५ कोटी, सिंधुदुर्ग १.७५ कोटी
जिल्ह्याच्या उद्दिष्टानुसार यावर्षी कोल्हापूरला ११ कोटी ७५ लाख, सांगलीला ९ कोटी, साताऱ्याला ७ कोटी २५ लाख, रत्नागिरीला ४ कोेटी २५ लाख, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला १ कोटी ८५ लाख रूपये करमणूक शुल्कापोटी वसूल करावे लागणार आहेत.