सात वर्षांत ७६० मृतांच्या वारसांना लाभ

By Admin | Updated: July 4, 2015 00:21 IST2015-07-04T00:18:32+5:302015-07-04T00:21:57+5:30

शेतकरी जनता अपघात विमा योजना : कृषी विभागातर्फे जनजागृती; अल्प प्रतिसाद

760 beneficiaries of the deceased in seven years | सात वर्षांत ७६० मृतांच्या वारसांना लाभ

सात वर्षांत ७६० मृतांच्या वारसांना लाभ

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -शासनाच्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेतून सात वर्षांत जिल्ह्यातील विविध अपघातांत मृत ७६० शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये मिळाले आहेत. आवश्यक कागदपत्रे गोळा करून प्रस्ताव देण्याकडे अनेक शेतकऱ्यांचे वारस दुर्लक्ष करीत असतात. परिणामी वारसांना पैसे मिळत नाहीत; म्हणून कृषी विभाग ही योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
शासनाच्या कृषी विभागाने २४ जून रोजी आणखी एक शेतकरी अपघात विमा योजना जाहीर केली आहे. या योजनेत शेतकऱ्याचा विमा हप्ता वार्षिक बारा रुपये असून तो शासन भरणार आहे. विम्याची नवी योजना जाहीर केल्यानंतर पूर्वीच्या अपघात विमा योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला, याची माहिती ‘लोकमत’ने घेतली. त्यावेळी पूर्वीच्या अपघात विमा योेजनेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे.
अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विजेचा धक्का लागणे, नैसर्गिक आपत्ती आणि वाहन अपघात यांमुळे शेतकऱ्यांंचा मृत्यू होतो. काही शेतकऱ्यांना अपंगत्व येते. कर्त्या व्यक्तीचा मृत्यू अथवा कायमचे अपंगत्व आल्यास संबंधित कुटुंब उघड्यावर पडते. त्यांना आर्थिक मदत व्हावी, म्हणून शेतकरी मृत झाल्यास त्याच्या वारसांना किंवा अपंगत्व आल्यास त्या शेतकऱ्याला शासनाचा कृषी विभाग तसेच विविध कंपन्यांच्या माध्यमातून पैसे दिले जातात. त्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा विमा हप्ता भरण्याची आवश्यकता नाही.
नैसर्गिक अथवा अपघातात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या वारसाला एक लाख, दोन डोळे, दोन अवयव, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख, एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास ५० हजार रुपये दिले जातात. पूर्वीचे अपंगत्व, आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न, वाहन परवाना नसताना वाहन चालविताना अपघाती मृत्यू झाल्यास, अमली पदार्थांच्या सेवनात मृत्यू झाल्यास, नैसर्गिक मृत्यू, भ्रमिष्टपणा, शर्यतीतील अपघात, सैन्यात नोकरीवर असताना, जवळच्या नातेवाइकांकडून झालेला खून झाल्यास वारसास विम्याचे पैसे मिळत नाहीत.


अपघात विमा योजना चांगली आहे. ज्यांना लाभ घ्यावयाचा आहे, त्यांनी गावातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी किंवा कृषी कार्यालयात संपर्क साधावा. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या विमा योजनेचा याचा लाभ घ्यावा.
- मोहन आटोळे,
जिल्हा कृषी अधिकारी

लाभासाठी आवश्यक कागदपत्रे
१० ते ७५ वर्षे वयोगटातील शेतकरी असल्याचा दाखला, सात-बारा, आठ अ, सहा-ड फेरफार उतारा, सहा क वारसा नोंद उतारा, प्रतिज्ञापत्र, वयाचा पुरावा, ‘एफआर’ची प्रत, घटनास्थळाचा पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, अपंगत्व आल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांचा दाखला, बँक खाते क्रमांक.


आकडे बोलतात...
वर्षनिहाय एक लाख रुपये मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या अशी पुढीलप्रमाणे : सन २००८-०९ : १०१, २००९-१० : १३२, २०१०-११ : १५८, २०११-१२ : ११३, २०१२-१३ : १३९, २०१३-१४ : १०५, २०१४-१५ : १२ शेतकरी.

Web Title: 760 beneficiaries of the deceased in seven years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.