नाशिक कुंभमेळ्यासाठी ७५० फुटांची महाज्योत

By Admin | Updated: July 7, 2015 01:21 IST2015-07-07T01:21:32+5:302015-07-07T01:21:32+5:30

१०८ दिवस पेटत राहणार : तमदलगे येथील शिरोळ मागासवर्गीय सूतगिरणीचा विशेष उपक्रम

750-feet Mahajyotha for Nashik Kumbh Mela | नाशिक कुंभमेळ्यासाठी ७५० फुटांची महाज्योत

नाशिक कुंभमेळ्यासाठी ७५० फुटांची महाज्योत

जयसिंगपूर : तमदलगे (ता. शिरोळ) येथील दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीने नाशिक येथील स्ािंहस्थ कुंभमेळ्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी अंतराचे ३६१७ किलोमीटर लांबीची अखंड सूतापासून ज्योत विनामूल्य तयार केली आहे. या ज्योतीचे नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यात १४ जुलैला दीपप्रज्वलन होणार आहे. अशाप्रकारची महाज्योत तयार करण्याचा पहिलाच उपक्रम असून, याची गिनिज बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याचे औचित्य साधून श्री जयगोपाल गायत्री सिद्धपीठ मुंबई व मोहर ग्रामविकास शिक्षण प्रतिष्ठाण पुणे यांच्यावतीने नाशिक तपोवन परिसरात उभारलेल्या ठिकाणी अखंड सूतापासून ३६१७ किलोमीटर लांबीची विश्वशांतीसाठी महाज्योत प्रज्वलित केली जाणार आहे. महाज्योत तयार करण्याचे कार्य नुकतेच माजी मंत्री बबनराव घोलप व श्री १००८ श्री हिमालय पीठाधिश्वर जगद्गुरू रामानुचार्य श्री हिमालय बाबा यांनी सूतगिरणीस भेट देऊन सोपविले होते. याचा मान देऊन आमच्या संस्थेने हे काम तडीस नेले आहे. संस्थेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गेले दोन महिने कष्ट करून या महाज्योतीची निर्मिती केली. याची जाडी ३ इंच असून, लांबी ७५० फूट इतकी तर या महाज्योतीमधील धागा ३६१७ किलोमीटर लांबीचा अखंड असून, वजन २२० किलो आहे. ते पुढे म्हणाले, या ज्योतीसाठी कमलपुष्पाच्या आकाराचा महाकाय २४ बाय २४ फुटाचा दीप पुण्यामध्ये बनविला आहे. या ज्योतीला एक तासाला एक लिटर तिळाचे तेल वापरण्यात येणार आहे.
नाशिक येथील तपोवन परिसरात मोठ्या आकाराचा खड्डा तयार करून येथे दीप बसविणार आहे. यामध्ये तिळाचे तेल टॅँकरद्वारे सोडण्यात येणार आहे. ज्योतीचे दीपप्रज्वलन १४ जुलै २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. ही ज्योत सलग १०८ दिवस तेवत राहणार असून, याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. महायज्ञाचे प्रयोजन भारतातील रोगराई, भूकंप, महादुष्काळ, महापूरहानी आणि जगातील मानवांच्या कल्याणासाठी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 750-feet Mahajyotha for Nashik Kumbh Mela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.