पहिल्या दिवशी ७५ बदल्या
By Admin | Updated: May 14, 2015 00:32 IST2015-05-13T23:35:58+5:302015-05-14T00:32:37+5:30
जिल्हा परिषदेत धडाका : आज ग्रामपंचायत, सामान्य प्रशासन विभागातील प्रक्रिया

पहिल्या दिवशी ७५ बदल्या
कोल्हापूर : जिल्हा परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका बुधवारपासून सुरू झाला. पहिल्या दिवशी कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, बांधकाम व महिला-बालकल्याण या विभागांतील ७५ बदल्या झाल्या. त्यामध्ये प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्यांचा समावेश आहे. आज, गुरुवारी ग्रामपंचायत व सामान्य प्रशासन विभागातील तर उद्या, शुक्रवारी शिक्षण विभागातील सर्वच संवर्गाच्या बदल्यांची प्रक्रिया राबविली जाईल.
दरवर्षी जिल्हा परिषदेमध्ये बदल्यांची प्रक्रिया राबविली जाते. मे महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांत बदल्यांची लगबग पाहावयास मिळत आहे. त्यामध्ये दहा वर्षे एकाच ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या, पाच वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या तर आपसी बदल्यांचाही समावेश आहे.
बुधवारी दुपारी साडेबारा वाजता बदल्यांच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) वाघमारे यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सायंकाळी पाचपर्यंतही प्रक्रिया सुरू होती.
कृषी, महिला-बालकल्याण, पशुसंवर्धन, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य या विभागातील एकूण ७५ बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये प्रशासकीय बदल्या २०, विनंती बदल्या ५३ व आपसी बदल्या २ आहेत. बांधकाम विभागातील शाखा अभियंता, स्थापत्य अभियंता, पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, कृषि विभागातील कृषि अधिकारी, कृषि विस्तार अधिकारी, आरोग्य विभागातील औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सहाय्यक (पुरुष), आरोग्य पर्यवेक्षक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), आरोग्य सहाय्यक (महिला) या पदांचा पहिल्या दिवशी झालेल्या बदल्यांमध्ये समावेश आहे.
आज, गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ग्रामपंचायत व सामान्य प्रशासन विभागातील सहा केडरमधील ४१ बदल्या होणार आहेत. त्यात ग्रामपंचायतीमधील २ व सामान्य प्रशासनामधील ४ बदल्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)