कोल्हापूर जिल्ह्यात ७५ टक्के मतदानं!
By Admin | Updated: October 16, 2014 00:49 IST2014-10-16T00:23:14+5:302014-10-16T00:49:20+5:30
विधानसभा निवडणूक : सांगलीत ७०, सिंधुदुर्गात ६८, तर रत्नागिरीत ६२ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यात ७५ टक्के मतदानं!
कोल्हापूर : कमालीची चुरस, पराकोटीच्या ईर्ष्येने कार्यकर्त्यांची सुरू असलेली घालमेल, त्यातून निर्माण होणारा तणाव, अशा वातावरणात आज, बुधवारी सायंकाळी पाचपर्यंत जिल्ह्यात ७०.३३ टक्के मतदान झाले. सर्वच मतदारसंघात दुपारपर्यंत रांगा लागल्या. आॅक्टोबर हिटचा तडाखा असह्य असूनही जिथे चुरस अधिक आहे, तिथे मताचा टक्का वाढला. सरासरी ७५ टक्क्यापर्यंत मतदान होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली. जिल्ह्यात दहा मतदारसंघांत १२१ उमेदवार रिंगणात आहेत. माजी जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह मातब्बरांचे भवितव्य मतयंत्रात बंद झाले.
सांगली : तुल्यबळ उमेदवार व बहुरंगी लढतींमुळे जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत आज चुरशीने ७०. ८४ टक्के मतदान झाले. पलूस-कडेगाव व तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघांत सर्वाधिक चुरस दिसली. १०७ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रांत बंद झाले आहे. सहा माजी मंत्र्यांसह दिग्गज उमेदवार मैदानात असल्यामुळे जिल्ह्यातील लढती लक्ष्यवेधी ठरल्या. सर्वच मतदारसंघांत तिरंगी, चौरंगी, पंचरंगी व बहुरंगी लढती असल्यामुळे मतदानही तितक्याच चुरशीने झाले.
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात विधानसभेसाठीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यात सुमारे ६८ टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यात मतदानाच्या सुरुवातीलाच मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने सात मतदान यंत्रे बदलली. याव्यतिरिक्त कोणत्याही तक्रारी प्राप्त नाहीत. परजिल्ह्यातील सुमारे बाराजणांना आतापर्यंत ताब्यात घेतले असून, अशा लोकांना शोधण्याची मोहीम तीव्र करणार असल्याचे सांगतानाच सावंतवाडी मोटारसायकल जळीत प्रकरणातील चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बाळा राणे यांचे अपहरण झाले नव्हते, तर ते नातलगांकडे गेले होते. ते सापडल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत सायंकाळी पाचपर्यंत सरासरी ५३.८३ टक्के मतदान झाले आहे. पुढच्या एका तासातील मतदानाचा विचार करता सुमारे ६० ते ६२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आज सायंकाळी उशिरा आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. सर्वाधिक मतदान चिपळुणात,
तर रत्नागिरीत सर्वांत कमी मतदान झाले.
विशेष...
कोल्हापुरात मारहाण
सांगलीत दोन ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी
रत्नागिरीतील एका मतदान केंद्रावर वाजले सनईचे सूर
सिंधुदुर्गात सात मतदान यंत्रांत बिघाड
सिंधुदुर्गात परजिल्ह्यातील
बाराजणांना घेतले ताब्यात