कोल्हापुरात यंदा ७३ दिवस पाऊस
By Admin | Updated: October 17, 2014 22:56 IST2014-10-17T21:16:00+5:302014-10-17T22:56:09+5:30
गेल्यावर्षीपेक्षा कमी : महाबळेश्वरपेक्षा गगनबावड्यात अधिक

कोल्हापुरात यंदा ७३ दिवस पाऊस
भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -विभागात गेल्यावर्षीपेक्षा यंदा कमी दिवस पाऊस झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र जून ते १६ आॅक्टोबरपर्यंत ७३ दिवस पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी ८५ दिवस पाऊस झाला होता. जुलै महिन्यात गगनबावडा आणि महाबळेश्वर येथे रोज पाऊस झाला आहे. विभागात एक महिना उशिरा दमदार पाऊस सुरू झाला. सांगली, सातारा या जिल्ह्यांच्या तुलनेतही कोल्हापूर जिल्ह्यातच सर्वाधिक दिवस पाऊस झाला आहे. विभागीय कृषी कार्यालयाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे.
सर्वसाधारपणे जून महिन्यात दमदार पावसाला प्रारंभ होतो. मृग नक्षत्रावर पेरण्या झाल्यानंतर उत्पादन अधिक येते, असा शेतकऱ्यांचा समज आहे. त्यामुळे मृगाचा मुहूर्त साधण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असते. मात्र, यंदा मान्सूनचे वेळेवर आगमन न झाल्याने वेळेवर पेरण्या झाल्या नाहीत. पश्चिम महाराष्ट्रात जून महिना पावसाचा म्हणून ओळखला जातो; परंतु यंदा संपूर्ण जून महिना दमदार पावसाविना गेला. संपूर्ण जिल्ह्यात जून महिन्यात केवळ नऊ दिवस, सांगली जिल्ह्यात पाच दिवस, सातारा जिल्ह्यात सहा दिवस पाऊस झाला आहे. शिरोळ तालुक्यात सर्वांत कमी म्हणजे दोन दिवस, तर गगनबावडा तालुक्यात १५ दिवस पाऊस झाला आहे. सर्वांत कमी वाई, फलटण (जि. सातारा) येथे दोन दिवस, तर मिरज (जि. सांगली) तालुक्यात तीन दिवस पाऊस झाला.
जुलै महिना सुरू झाल्यानंतर संततधार पावसाला प्रारंभ झाला. जुलै महिन्यामध्ये गगनबावडा आणि महाबळेश्वर तालुक्यांत सलग ३० दिवस पाऊस कोसळला. शिरोळ, पन्हाळा तालुक्यांत सर्वांत कमी १६, आटपाडी तालुक्यात पाच, जत तालुक्यात आठ, फलटण तालुक्यात चार दिवस इतका पाऊस पडला आहे. आॅगस्ट महिन्यात मात्र जुलै महिन्यात सर्वांत कमी झालेल्या या तालुक्यांत बरा पाऊस झाला आहे. यामुळे आटपाडी, जत, फलटण तालुक्यांत उशिराने पेरण्या झाल्या. शिरोळ तालुक्यात पाऊस कमी झाला तरी पाण्याची मुबलक उपलब्धता असल्यामुळे जून महिन्यात वेळेवर पेरण्या झाल्या. जुलै महिन्यातील पावसाचा जोर आॅगस्ट महिनाअखेरपर्यंत कायम राहिला. आॅगस्ट महिन्यात तीन जिह्यांतील सर्वच तालुक्यांत कमीत कमी १५ दिवस पाऊस झाला आहे.
यंदाचा पाऊस किती दिवस ?
सांगली जिल्हा यंदाचा गेल्यावर्षीचा
मिरज४८४४
जत३०३०
खानापूर४७४५
वाळवा४८४१
तासगाव३८३४
शिराळा७४७३
आटपाडी२८२५
कवठेमहांकाळ३८३२
पलूस३६३१
कडेगाव५०४१
१२ दिवस कमी...
विभागातील तिन्ही जिल्ह्यांत गेल्यावर्षीपेक्षा यंदा कमी दिवस पाऊस झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्यावर्षीपेक्षा यंदा १२ दिवस, सांगली जिल्ह्यात पाच दिवस, सातारा जिल्ह्यात सहा दिवस पाऊस कमी झाला आहे. चार महिन्यांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १०० दिवस, तर महाबळेश्वर तालुक्यात ९६ दिवस पाऊस झाला आहे.