राज्यातील जिल्हा बँकांना ७३ कोटींचा फटका

By admin | Published: June 27, 2017 01:19 AM2017-06-27T01:19:49+5:302017-06-27T01:19:49+5:30

व्याज द्यावे लागणार : लॉकरमध्ये आठ महिने जुन्या नोटा पडून राहिल्यामुळे नुकसान

73 crore in district banks in district | राज्यातील जिल्हा बँकांना ७३ कोटींचा फटका

राज्यातील जिल्हा बँकांना ७३ कोटींचा फटका

Next

रमेश पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये जमा झालेल्या सुमारे दोन हजार ७७१ कोटी रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँक जरी स्वीकारणार असली, तरी या रकमेवर देण्यात येणाऱ्या व्याजाचा जिल्हा बँकांना ७३ कोटी २९ लाख ३३ हजार ३३३ रुपयांचा फटका बसणार आहे.
नोव्हेंबर २०१६ ला नोटाबंदी जाहीर झाली. जिल्हा बँकांनी पुढे आठवडाभर जुन्या नोटा स्वीकारल्या. मात्र, त्यांना नंतर नोटा स्वीकारण्यास व पुढे या नोटा बदलून देण्यावर बंदी घातली. या नोटा बदलून देण्याच्या काळात राज्यातील २७ जिल्हा बँकांपैकी २१ जिल्हा बँकांमध्ये दोन हजार ७७१ कोटी रुपये जमा झाले. ही जमा झालेली रक्कम बँकांच्या लॉकरमध्ये तशीच पडून राहिली. मात्र, त्याच वेळी या जमा झालेल्या रकमेवर मात्र व्याज चालू राहिले.
नोटाबंदीच्या काळात बँकांमध्ये नोव्हेंबरमध्ये जमा झालेला पैसा ३१ मार्च २०१७ ला तसाच पडून होता. मात्र, या काळात बहुतेक बँकांमध्ये आॅनलाईन व्यवहार असल्याने ३१ मार्च २०१७ ला सेव्हिंगच्या चार टक्के व्याज दराने व्याजाची रक्कम खात्यावर जमा झाली. म्हणजेच जमा झालेल्या रकमेतून एक रुपयाचेही उत्पन्न मिळाले नाही. मात्र, या ३१ मार्चपर्यंत म्हणजेच या पाच महिन्यांच्या काळात बँकांना मात्र ४६ कोटी १८ लाख २८ हजार ३३० रुपयांचा व्याजापोटी फटका बसला. अजून एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांचे व्याज सप्टेंबरमध्ये बचत ठेवीदारांच्या खात्यावर जमा होणार आहे. ही तीन महिने व्याजाची रक्कम २७ कोटी ७० लाख ९६ हजार ९९८ रुपये असणार आहे. एकंदरीत नोटाबंदीच्या काळात जिल्हा बँकांना वेळेत नोटा बदलून न मिळाल्याने तोटा झाला हे मात्र निश्चित.

कर्जदार ग्राहकांचा फायदा
नोटाबंदीच्या काळात अनेक जिल्हा बँकांमध्ये खातेदारांनी पैसे जमा केले. पुढे काही दिवसांनी खात्यावरील जमा रकमेतून काही रक्कम कर्जाला, तर काही रक्कम नातेवाइकांच्या कर्जाला जमा झाली. यामध्ये बँकांचे कर्ज क्लोज झाले; परंतु कर्ज क्लोज झालेल्या तारखेला बदललेल्या नोटांची रक्कम न मिळाल्याने बँकांचा तोटा झाला.


केडीसीसीला सर्वांत जास्त फटका
कोल्हापूर जिल्हा बँकेत नोटाबंदीच्या काळात २७९ कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या होत्या. त्याचा
फटका या बँकेला सर्वांत जास्त म्हणजे ३६ कोटींचा फटका बसला आहे.

रक्कम गुंतवावी लागणार
जमा झालेल्या नोटांच्या बदल्यात बँकांना नवे चलन मिळणार नाही. त्या ऐवजी तेवढीच रक्कम बँकेच्या खात्यावर जमा होणार आहे. इतकी मोठी रक्कम खात्यावर जमा झाल्यास ती रक्कम बँकांना बँका त्यांच्या सोयीनुसार विविध खात्यांमध्ये गुंतवतील.

बँकांच्या नफ्यावर परिणाम
राज्यातील लहान-मोठ्या अशा सर्वच बँकांना एक कोटीपासून ते अगदी ३६ कोटींपर्यंत फटका बसल्याने त्याचा परिणाम बँकांच्या ताळेबंदावर निश्चित होणार आहे. हा फटका बँकांमध्ये किती कोटीच्या नोटा जमा झाल्या आहेत, त्यावर अवलंबून असणार आहे.

Web Title: 73 crore in district banks in district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.