राज्यातील १३ लाख यंत्रमागधारकांना ७०० कोटींची वीज सवलत, सहा वर्षांनंतर मिळाला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 05:25 PM2024-03-12T17:25:25+5:302024-03-12T17:25:51+5:30

इचलकरंजीतील यंत्रमागधारकांना १५ कोटींचा फायदा

700 crore electricity concession to 13 lakh textileartist owners in the state | राज्यातील १३ लाख यंत्रमागधारकांना ७०० कोटींची वीज सवलत, सहा वर्षांनंतर मिळाला दिलासा

राज्यातील १३ लाख यंत्रमागधारकांना ७०० कोटींची वीज सवलत, सहा वर्षांनंतर मिळाला दिलासा

इचलकरंजी : राज्यातील साध्या आणि अत्याधुनिक यंत्रमागांना अतिरिक्त वीज सवलत लागू करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ मार्चला कोरोची (ता. हातकणंगले) येथे केलेल्या घोषणेची पूर्तता केली. या निर्णयामुळे राज्यातील तेरा लाख यंत्रमाग उद्योजकांना सुमारे ७०० कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

गेल्या सहा वर्षांपासून यंत्रमागाला विजेमध्ये सवलत देण्याची मागणी राज्यातील सर्वच यंत्रमागधारकांकडून करण्यात येत होती. त्यासंदर्भात माजी वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घोषणा केली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत साध्या व अत्याधुनिक यंत्रमागांना अतिरिक्त वीज सवलत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

२७ अश्वशक्तीपेक्षा जास्त, पण २०१ अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रतियुनिट ७५ पैसे अतिरिक्त वीज सवलत देण्यात येईल. २७ अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रतियुनिट १ रुपये अतिरिक्त वीज सवलत लागू करण्यात येईल. ही वीज सवलत मिळण्यासाठी २७ अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना तसेच २७ अश्वशक्तीपेक्षा जास्त परंतु २०१ अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग उद्योगांना वस्त्रोद्योग विभागाकडे नोंदणी करावी लागेल व ज्यांना मान्यता मिळेल, अशा उद्योगांना ही सवलत लागू राहील. राज्य सरकारने जाहीर केलेल्या सन २०२३ ते २०२८ या वस्त्रोद्योग धोरणाच्या कालावधीमध्ये ही सवलत लागू असणार आहे.

१३ लाख यंत्रमागांना फायदा

राज्यामध्ये बारा ते तेरा लाख साधे यंत्रमाग आहेत, तर २५ ते ३० हजार अत्याधुनिक यंत्रमाग आहेत. साध्या यंत्रमागाला दरमहा २५० युनिट, तर अत्याधुनिक यंत्रमागाला दरमहा ४०० युनिट वीज लागते. सरकारने जाहीर केलेल्या या निर्णयामुळे यंत्रमागधारकांना सुमारे ६०० ते ७०० कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.

इचलकरंजीतील यंत्रमागधारकांना १५ कोटींचा फायदा

इचलकरंजी शहरामध्ये ८० ते ८५ साधे यंत्रमाग, तर १५ ते २० हजार अत्याधुनिक यंत्रमाग आहेत. साध्या यंत्रमागाला दरमहा अडीच कोटी रुपये, तर अत्याधुनिक यंत्रमागाला १२ ते १३ कोटी रुपये असा दरमहा सुमारे १५ कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.

Web Title: 700 crore electricity concession to 13 lakh textileartist owners in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.