सतीश काळसेकर कुटुंबीयांकडून विद्यापीठास ७ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:26 IST2021-09-19T04:26:05+5:302021-09-19T04:26:05+5:30

कोल्हापूर : मराठीतील दिवगंत कवी सतीश काळसेकर व ऋत्विज काळसेकर यांच्या नावे शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दोन कवींना सन्मानित केले ...

7 lakh fund from Satish Kalsekar family to the university | सतीश काळसेकर कुटुंबीयांकडून विद्यापीठास ७ लाखांचा निधी

सतीश काळसेकर कुटुंबीयांकडून विद्यापीठास ७ लाखांचा निधी

कोल्हापूर : मराठीतील दिवगंत कवी सतीश काळसेकर व ऋत्विज काळसेकर यांच्या नावे शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दोन कवींना सन्मानित केले जाणार आहे. याकरिता त्यांच्या पत्नी सुप्रिया काळसेकर यांनी सात लाख रुपयांचा धनादेश कुलगुरू डाॅ.डी.टी. शिर्के यांच्याकडे शनिवारी सुपुर्द केला.

सतीश काळसेकर यांच्या वाङ्मयीन कार्याचे स्मरण म्हणून शिवाजी विद्यापीठाने दरवर्षी मराठीतील लक्षणीय काव्यलेखन करणाऱ्या कवीला पुरस्कार देण्यात यावा, अशी इच्छा काळसेकर यांच्या पत्नी सुप्रिया काळसेकर यांनी व्यक्त केली. ते मराठीतील नामवंत कवी, लेखक, अनुवादक, संपादक, ग्रंथसंग्राहक होते. वाङ्मयीन वर्तुळात एक उत्तम वाचक व ग्रंथ संग्राहक म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांच्या ‘वाचणाऱ्यांची रोजनिशी’ या ग्रंथास साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ‘ऋत्विज काळसेकर हेही नव्या पिढीतील आश्वासक कवी होते. त्यांचा ‘काळोखाच्या तळाशी’ हा लक्षणीय संग्रह प्रकाशित आहे. काळसेकर यांच्या वाङ्मयीन कार्याचे स्मरण, तसेच आधुनिक मराठी साहित्यातील महत्त्वाच्या कवींचा सन्मान या निमित्ताने होणार आहे, अशी भावना यावेळी कुलगुरू डॉ.शिर्के यांनी व्यक्त केली. या रकमेच्या व्याजातून ‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’ व ‘ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार’ देण्यात येणार आहेत.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ.पी.एस. पाटील यांच्यासह वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, डॉ.रणधीर शिंदे, डॉ.मेघा पानसरे, आदित्य काळसेकर, विप्लव काळसेकर, डॉ.उदय नारकर आदी उपस्थित होते.

फाेटो : १८०९२०२१-कोल-शिवाजी विद्यापीठ

ओळी : दिवंगत कवी सतीश काळसेकर यांच्या स्मरणार्थ सुप्रिया काळसेकर यांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी. शिर्के यांच्याकडे सात लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द केला. यावेळी डॉ.मेघा पानसरे, प्र-कुलगुरू डॉ.पी.एस. पाटील, आदित्य काळसेकर, डॉ.उदय नारकर, विप्लव काळसेकर, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, डॉ.रणधीर शिंदे उपस्थित होते.

Web Title: 7 lakh fund from Satish Kalsekar family to the university