निपाणी परिसरात संततधार, ७ बंधारे पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:07+5:302021-06-18T04:17:07+5:30
निपाणी : गेल्या दोन दिवसांपासून निपाणी तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने निपाणी व चिकोडी तालुक्यातील ७ बंधारे पाण्याखाली गेले ...

निपाणी परिसरात संततधार, ७ बंधारे पाण्याखाली
निपाणी : गेल्या दोन दिवसांपासून निपाणी तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने निपाणी व चिकोडी तालुक्यातील ७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, यामुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे. २०१९ साली आलेल्या पुरातून अद्याप पूरग्रस्त सावरलेले नाहीत. जूनच्या मध्यातच पावसाने जोर धरल्याने भीती निर्माण झाली आहे.
२०१९ साली आलेल्या महापुराने निपाणी तालुक्यातील २६ गावांना फटका बसला होता. महापुरामध्ये नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने मदत करण्याचे जाहीर केले होते. पण काही पूरग्रस्त नागरिकांना ही मदत मिळाली नसल्याने हे नागरिक धोकादायक ठिकाणीच राहत आहेत. त्यांचे स्थलांतर झालेले नाही.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निपाणी-चिकोडी तालुक्यातील सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दूधगंगा व वेदगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे काही प्रमाणात शेतीतही पाणी शिरले आहे.
वेदगंगा नदीवरील जत्राट-भिवशी, अकोळ-सिदनाळ, भोजवाडी-शिवापूरवाडी, ते बंधारे तर दूधगंगा नदीवरील बारवाड-कुन्नूर, कारदगा-भोज, मलिकवाड-दत्तवाड, एकसंबा-दत्तवाड आदी बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सुरुवातीच्या पावसानेच हे बंधारे पाण्याखाली गेल्याने पूरग्रस्त भागात भीती पसरली आहे.
२०१९ च्या पुरात काय घडले?
निपाणी तालुक्यात २०१९ ला आलेल्या महापुरात एकूण ३५८४ घरांची पडझड झाली होती. यापैकी ५०८ घरांचे १०० टक्के तर २१८८ घरांचे १५ ते २५ टक्के नुकसान झाले होते. तर ८८८ घरांचे २५ ते ७५ टक्के नुकसान झाले होते.
फोटो
निपाणी : दोन दिवस पावसाने विश्रांती न घेतल्याने जत्राट बंधारा पाण्याखाली गेला आहे.