‘भोगावती’चे ६४६५ सभासद अपात्र
By Admin | Updated: June 11, 2016 01:12 IST2016-06-11T01:12:01+5:302016-06-11T01:12:21+5:30
कॉँग्रेस-राष्ट्रवादीला दणका : साखर सहसंचालक मंगळवारी न्यायालयात अहवाल सादर करणार

‘भोगावती’चे ६४६५ सभासद अपात्र
कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे वाढीव ६४६५ सभासद अपात्र ठरले. प्रादेशिक साखर सहसंचालकांनी केलेल्या चौकशीत एवढे सभासद बोगस आढळले असून, केवळ ६६७ सभासद पात्र ठरले.
पात्र-अपात्र सभासदांचा अहवाल सहसंचालक मंगळवारी (दि. १४) उच्च न्यायालयात सादर करणार असून, या निर्णयामुळे कॉँग्रेस व राष्ट्रवादी-शेकाप आघाडीला चांगलाच दणका बसला आहे.
राष्ट्रवादी-शेकाप आघाडीने केलेल्या ३४८६ वाढीव सभासदांविरोधात कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले यांनी ३० जुलै २०१२ रोजी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे तक्रार केली होती. त्याचबरोबर कॉँग्रेस कालावधीत झालेल्या ४६५७ वाढीव सभासदांविरोधात बाबूराव पाटील यांनीही तक्रार केली होती.
वाढीव सभासदांची महसूल विभागामार्फत छाननी करण्याची मागणी त्यांनी केली होती. हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर न्यायालयाने वाढीव सभासदांची महसूल तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रादेशिक साखर
सहसंचालकांनी सभासदनिहाय कागदपत्रांची तपासणी केली. सभासदांनी सादर केलेल्या महसुली पुराव्यांची संबंधित गावातील तलाठ्यांमार्फत चौकशी करण्यात आली. यामध्ये अनेकांचे महसुली पुरावे बोगस निघाल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ ६६७ सभासद पात्र ठरले असून ६४६५ सभासद पात्र ठरले. या निर्णयामुळे कॉँग्रेस, राष्ट्रवादी-शेकाप यांना मोठा दणका बसला आहे.
वाढीव सभासदांबाबत मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी आहे. यावेळीच प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावल हे अहवाल सादर करणार आहेत.
अपात्र सभासद कोणत्या निकषावर केले हे माहिती नाही. मात्र, ज्या सभासदांना अपात्र ठरवले आहे, त्यांच्यावर हा अन्याय आहे. हा चुकीचा निर्णय असून, याबाबत योग्यवेळी न्याय मागू.
- धैर्यशील पाटील-कौलवकर,
माजी अध्यक्ष, भोगावती कारखाना
न्यायालयाने केवळ २०१० नंतर झालेल्या सभासदांची तपासणी करण्याचे आदेश दिले असताना साखर सहसंचालकांनी २००० पासूनच्या सभासदांची तपासणी करून अन्याय केला आहे. याबाबत यापूर्वीच न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
- ए. डी. चौगले, कॉँग्रेस नेते
अपात्र सभासदांच्या
साखरेचे काय ?
सन २००० ते २०१० या कालावधीत केलेल्या सभासदांनी कारखान्याच्या निवडणुकीत मतदान केले होते. त्याचबरोबर अपात्र ६४६५ शेतकऱ्यांनी सभासद झाल्यापासून महिन्याला पाच किलो साखर सवलतीच्या दरात घेतल्याने कारखान्याचा कोट्यवधींचा तोटा झाला आहे. याबाबत सहसंचालक काय निर्णय घेणार, याविषयी उत्सुकता आहे.
हे लावले निकष -
अठरा वर्षे पूर्ण असावा...
संबंधिताच्या नावावर किमान २० गुंठे क्षेत्र आवश्यक आहे.
ऊस उत्पादक शेतकरी असावा.
त्याने पाच रुपये प्रवेश फीसह १२५० रुपये भागापोटी भरलेले पाहिजेत.