६४ वर्षीय मारुती पाटील यांची सायकलने पंढरपूर वारी
By Admin | Updated: April 8, 2015 00:29 IST2015-04-07T22:04:34+5:302015-04-08T00:29:09+5:30
आजच्या तरुणाईला व्यायाम आणि शरीर तंदुरुस्तीचा जणू वस्तूपाठच घालून देणारा आहे.

६४ वर्षीय मारुती पाटील यांची सायकलने पंढरपूर वारी
म्हाकवे : आजच्या विज्ञानयुगात प्रवासाच्या सर्व सेवासुविधा उपलब्ध असतानाही हदनाळ (ता. चिक्कोडी) येथील मारुती विष्णू पाटील यांनी वयाच्या ६४व्या वर्षीही तब्बल सव्वादोनशे कि. मी. अंतर सायकलने पार करून पंढरपूरची १४वी चैत्रवारी केली. ताशी १५ कि. मी. अंतर पार करून १७ तासांच्या प्रवासानंतर ते पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनाला हजर होतात.
निपाणी, मुरगूड, कागल, कोल्हापुरातील आपल्या व्यक्तिगत कामासाठी ते सायकलनेच प्रवास करतात. त्यांचा हा नित्यक्रम आजच्या तरुणाईला व्यायाम आणि शरीर तंदुरुस्तीचा जणू वस्तूपाठच घालून देणारा आहे. सध्या मोटारसायकलसह आलिशान गाड्यांच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे चालणे, फिरण्यासह सायकलनेही प्रवास करणे बंद होत चालले आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसह ऊसतोड करणाऱ्यांच्या मुलाकडेही मोटारसायकल दिसते. परंतु, मारुती पाटील यांनी सायकलनेच प्रवास करण्याचा जोपासलेला छंद उतार वयातही कायम ठेवला आहे. ते आपल्या पै-पाहुण्यांकडे, नातेवाइकांकडे अथवा निपाणी, मुरगूड, कागल, कोल्हापूर येथील कामेही सायकलनेच जाऊन करतात. दरम्यान, व्यवसायाने शेतकरी असणाऱ्या पाटील यांनी शेतीही अत्यंत चिकित्सकपणे केली आहे. दोन एकरामध्ये कुटुंबाला आवश्यक सर्व धान्य उत्पादित केले जाते. (वार्ताहर)
सायकलने प्रवास करून पांडुरंगाचे दर्शन घेतल्याने मला आत्मिक समाधान मिळते. तसेच आजच्या महागाईच्या काळात प्रवासाचा वाढता खर्च न पेलणारा आहे. सायकलीला मी धनलक्ष्मीच मानत असून, शेवटच्या क्षणापर्यंत सायकलनेच प्रवास करण्याचा निर्धार केला आहे.
- मारुती पाटील,
हदनाळ, ता. चिकोडी.