सहा लाखांचा औषधसाठा जप्त- : मिरजेत कारवाई;
By Admin | Updated: July 22, 2014 00:39 IST2014-07-22T00:35:10+5:302014-07-22T00:39:53+5:30
‘लोकमत’चा दणका -सांगली ‘सिव्हिल’मधील साठा सील

सहा लाखांचा औषधसाठा जप्त- : मिरजेत कारवाई;
सांगली : ‘लोकमत’च्या दणक्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन खडबडून जागे झाले. राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत मोफत मिळणाऱ्या, मात्र सांगली-मिरजेतील शासकीय रुग्णालयांतून पैसे घेऊन विकल्या जाणाऱ्या बेकायदा औषध साठ्याविरुद्ध या विभागाने काल (रविवारी) सुरू केलेले छापासत्र आज सायंकाळी पाच वाजता पूर्ण झाले. मिरजेच्या शासकीय रुग्णालयातून पाच लाख ८६ हजार रुपये किमतीचा औषधांचा साठा जप्त केला आहे. सांगलीच्या रुग्णालयातील साठा सील करण्यात आला आहे. त्याची उद्या (मंगळवार) किंमत ठरवून तो जप्त केला जाणार आहे. राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत गरीब रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. मिरजेतील शासकीय रुग्णालयात अधिष्ठातांच्या कार्यालयाजवळ एका खोलीत या औषधांचा साठा करून त्यांची विक्री केली जात होती, तर सांगलीतील रुग्णालयात साठा करण्यासाठी कोणताही परवाना घेतलेला नाही. याविषयी ‘लोकमत’ने रविवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन खडबडून जागा झाले. निरीक्षक विजय नांगरे, जयश्री सौंदत्ती यांच्या पथकाने रविवारी सायंकाळी एकाचवेळी स्वतंत्रपणे या दोन्ही रुग्णालयांतील औषध साठ्यावर छापा टाकला होता. नांगरे यांनी मिरजेत कारवाई सुरू केली होती, ती सोमवारी सायंकाळी पाच वाजता पूर्ण झाली. यामध्ये पाच लाख ८६ हजार रुपये किमतीचा औषधसाठा जप्त केला आहे. सांगलीतील रुग्णालयात निरीक्षक जयश्री सौंदत्ती यांनी रविवारी रात्री नऊ वाजता तपासणी सुरू केली होती. ती सोमवारी पहाटे तीन वाजता पूर्ण झाली. यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधसाठा हाती लागला असून, तो सध्या सील करण्यात आला आहे. त्याची किंमत ठरवून तो जप्त करण्याची कार्यवाही मंगळवारी पूर्ण केली जाणार असल्याचे सौंदत्ती यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, रुग्णालयातील खोली क्रमांक तीसमध्ये औषधसाठा असल्याचे समजले होते. मात्र प्रत्यक्षात या खोलीत काहीच नव्हते. खोली क्रमांक अठराजवळ हा साठा सापडला. सांगली, मिरजेत झालेल्या कारवाईचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. त्यांच्या आदेशानुसार आता पुढील कार्यवाही केली जाईल. राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत मोफत औषधांचा पुरवठा करण्याचा ठेका पलूस येथील ‘दीप मेडिकल’ला मिळाला आहे. त्यांनी लाभार्थी रुग्णांना त्यांच्या औषध दुकानामधून या औषधांचा पुरवठा करायचा आहे. यासाठी त्यांना दिवसातून दोन तास वेळ देण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांनी सांगली, मिरजेतील शासकीय रुग्णालयात दुकान थाटून बेकायदा साठा केल्याचे निष्पन्न झाले आहे.