सहा कोटींचे शिलकी अंदाजपत्रक चर्चेविना मंजूर
By Admin | Updated: February 27, 2015 23:25 IST2015-02-27T21:22:14+5:302015-02-27T23:25:04+5:30
इचलकरंजी पालिका : ३३९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक; करवाढ नसल्याने दिलासा, आवश्यक बाबींसाठी योग्य तरतूद

सहा कोटींचे शिलकी अंदाजपत्रक चर्चेविना मंजूर
इचलकरंजी : येथील नगरपालिकेच्या विशेष सभेत शुक्रवारी ३३९ कोटी सहा लाख ९३ हजार रुपयांचे वार्षिक अंदाजपत्रक सहा कोटी अडीच लाख रुपयांचे शिलकी बजेट ठेवून चर्चेविनाच एकमताने मंजूर करण्यात आले. दरम्यान, या अंदाजपत्रकात आवश्यक बाबींसाठी योग्य तरतूद करण्यात आली असून, नागरिकांवर कोणतीही करवाढ लादण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासादायक बजेट नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी सादर केले आहे.नगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्षा बिरंजे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. सन २०१५-१६ साठीच्या वार्षिक अंदाजपत्रकात जमेच्या बाजूमध्ये विविध कर ३३ कोटी ४२ लाख ४३ हजार, विशिष्ट कायद्यान्वये येणारी जमा चार कोटी ४० लाख १५ हजार, कराव्यतिरिक्त मिळणारे उत्पन्न १३ कोटी ३९ लाख ३१ हजार, वर्गणी ग्रँटस् वगैरे ८४ कोटी ९० लाख, किरकोळ उत्पन्न नऊ कोटी ७७ लाख ५२ हजार, त्याचबरोबर भांडवली जमा १५५ कोटी ५९ लाख ६२ हजार, असाधारण कर्ज डिपॉझिट १९ कोटी ९ लाख ८३ हजार, असे एकूण ३२० कोटी ६८ लाख ८८ हजार व सुरुवातीची शिल्लक १८ कोटी ३८ लाख अशी एकूण ३३९ कोटी ६ लाख ९३ हजार २२१ रुपयांच्या जमेच्या बाजू आहेत.खर्चाच्या तरतुदींमध्ये सामान्य कारभार २९ कोटी २५ लाख १० हजार, आग, दिवाबत्ती, सुरक्षितता चार कोटी ३२ लाख ५० हजार, सार्वजनिक आरोग्य सुख-सोयी देखरेख ९४ कोटी २४ लाख ८ हजार, शिक्षण, देणग्या वगैरे ११ कोटी १० लाख ४४ हजार, किरकोळ खर्च, दावे, खटले, इत्यादी तीन कोटी ४९ लाख ६२ हजार, तसेच भागभांडवलीखर्च १७४ कोटी ८९ लाख ३२ हजार, असाधारण कर्ज डिपॉझिट १५ कोटी ७३ लाख २० हजार, असा एकूण अंदाजे खर्च ३३३ कोटी चार लाख ३७ हजार ५६२ रुपयांचा धरण्यात आला आहे. यामधून जमेच्या बाजू वजा करता सहा कोटी दोन लाख ५५ हजार ६५९ रुपये शिल्लक रक्कम धरण्यात आली आहे.सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये शहरातील सुरक्षिततेच्यादृष्टीने सीसीटीव्ही बसविण्यासाठी ३६ लाख रुपये, नगरपालिकेच्या वाहनांना ट्रॅकिंग सिस्टीम बसविण्यासाठी पाच लाख रुपये, केंद्र शासनाकडून आलेल्या सूचनेनुसार शहराचा पुढील २५ वर्षांचा शहर विकास आराखड्यासाठी १२ लाख, आरोग्य खात्यासाठी ३३ कोटी १८ लाख, पाणीपुरवठ्यासाठी १८ कोटी ५९ लाख, शिक्षण सहा कोटी १० लाख, शिक्षण समिती पाच कोटी, महिला व बालकल्याण ५५ लाख, आर्थिक दुर्बल घटक योजना एक कोटी ५२ लाख, लेक वाचवा ३० लाख, भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण सात लाख, स्वच्छता सात कोटी, इमारती देखभाल दुरुस्ती दीड कोटी, वाहतूक, आयलंड, सिग्नल, रंगीत कारंजे ४० लाख यासह उन्हाळ्यामध्ये पाणीप्रश्न मिटविण्यासाठी ९८ ठिकाणी सबमर्सिबल पंप व पाण्याच्या टाक्या बसविणे, मुख्य मार्गावर एलईडी दिवे बसविणे, रस्ते, गटार, वृक्षारोपण यासाठीही तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने सूचविलेल्या अंदाजपत्रकात सुमारे ८५ कोटींची वाढ स्थायी समितीने दाखविली आहे. याबाबत सविस्तर चर्चा करण्याची मागणी नगरसेवक भीमराव अतिग्रे यांनी केली. याकडे दुर्लक्ष करत अन्य सदस्यांनी मंजूर-मंजूर म्हणत चर्चेविनाच अंतिम मंजुरी दिली.
जनगणनेत ३५ हजार लोक गायब
सभेमधील पहिला विषय सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणानुसार प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप यादीवर अभिप्राय-ठराव दाखल करणे हा होता. यावर नगरसेवक बाळासाहेब कलागते यांनी आक्षेप घेत ही जनगणना चुकीच्या पद्धतीने करण्यात आली असून, यामध्ये शहरातील ३५ हजार लोक कमी दाखविण्यात आले आहेत. नगरपालिकेची मतदार संख्या व सर्वेक्षण संख्या यामध्ये तफावत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार जनगणनेची सीडी प्रत्येक नगरसेवकाला देऊन त्यांच्या भागातील यादीची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.