शहरात वाहनधारकांकडून ५८ लाखांवर दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:23 IST2021-05-19T04:23:26+5:302021-05-19T04:23:26+5:30
कोल्हापूर : कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनमध्ये कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कायद्याचा ...

शहरात वाहनधारकांकडून ५८ लाखांवर दंड वसूल
कोल्हापूर : कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनमध्ये कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कायद्याचा बडगा उगारत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांत वाहनधारकांकडून तब्बल ५८ लाख ६५ हजार रुपये दंड वसूल केला, तर आठवड्यात तब्बल २३८८ दुचाकी वाहने जप्तीची कारवाई केली.
जिल्ह्यात कोरोना महामारीचा उद्रेक झाला आहे. त्याला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपायोजना केल्या; पण कोरोना रुग्णांचा व मृत्यूचा अकडा वाढतच आहे. प्रथम संचारबंदी पुकारली, त्यात नागरिकांना पोलिसांच्या वतीने कोरोना संकटावर मात करण्यासाठी प्रबोधन केले; पण नागरिकांची रस्त्यावरील गर्दी हटेना, अखेर दि. १४ मेपासून लॉकडाऊन केले. त्या कालावधीत नागरिकांची गैरसोय नको म्हणून अत्यावश्यक अस्थापना सकाळी ७ ते ११ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली; पण बाजारपेठेत, भाजी मार्केटमध्ये गर्दी हटेना, त्यामुळे रुग्ण व मृत्यूचे प्रमाणही कमी येईना. अखेर नाईलाजास्तव प्रशासनाने कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे रस्त्यावर नाहक फिरणाऱ्यांना चाप बसला.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनानुसार शहरातील चारही पोलीस ठाण्यांच्या मदतीने हद्दीत नाकाबंदी करून वाहनांची आडवणूक, तपासणी, जप्ती व कारवाईची भूमिका घेतली. चारही पोलीस ठाण्याच्या सहकार्याने शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्या पोलीस पथकांनी कागदपत्रे पुरेशी नसणे, वाहतूक चालक परवाना नसणे तसेच नाहक रस्त्यावरून फिरणे या नियमांखाली वाहनांवर कारवाई करत सुमारे २३८८ दुचाकी वाहने जप्त केली. तर पंधरा दिवसांत मोटर व्हेइकल ॲक्टअंतर्गत सुमारे २८ हजार ११७ वाहनांवर गुन्हे नोंदवले, तर गेल्या पंधरा दिवसांत तब्बल ५८ लाख ६५ हजार ४०० रुपये दंड वाहनधारकांकडून वसूल करून तो शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला.
वाहतूक शाखेसह ‘मेन राजाराम’मध्ये जप्त वाहने
शहरात रविवारपासून कडक लॉकडाऊन केल्यानंतर रस्त्यावरील वाहनांची वर्दळ पूर्णपणे थांबली. फक्त अत्यावश्यक सेवेतीलच वाहने रस्त्यावर दिसू लागली. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी जप्त केल्या. गेल्या आठवडाभरात सुमारे २३८८ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, त्या शहर वाहतूक शाखेच्या आवारात तसेच भवानी मंडपशेजारील मेन राजाराम हायस्कूलच्या जागेत उभ्या केल्या आहेत. ही वाहने लॉकडाऊन संपल्यानंतर कागदपत्रांची तपासणी करून रीतसर दंड भरून मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.
कोट...
लॉकडाऊननंतर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी जप्त केली, चारचाकी वाहनांची कसून तपासणी केली. येथून पुढे नाहक रस्त्यावर फिरणारी चारचाकी वाहनेही जप्त करून ताब्यात घेण्यात येणार आहेत. - स्नेहा गिरी, पोलीस निरीक्षक, शहर नियंत्रक वाहतूक शाखा, कोल्हापूर
फोटो नं. १८०५२०२१-कोल-सीटी ट्रॅफीक पोलीस ॲक्शन
ओळ : कोल्हापूर शहरात गेल्या आठवडभरात लॉकडाऊन कालावधीत रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या जप्त केलेल्या दुचाकी मेन राजाराम हायस्कूलच्या पटांगणात ठेवण्यात आल्या आहेत.
===Photopath===
180521\18kol_2_18052021_5.jpg
===Caption===
ओळ : कोल्हापूर शहरात गेल्या आठवडभरात लॉकडाउन कालावधीत रस्त्यावर विनाकारण फिरणार्या जप्त केलेल्या दुचाकी मेन राजाराम हायस्कूलच्या पटांगणात ठेवण्यात आल्या आहेत.