बेळगावात दंगलप्रकरणी ५५ अटकेत
By Admin | Updated: July 14, 2015 01:14 IST2015-07-14T01:12:48+5:302015-07-14T01:14:33+5:30
गांधीनगरमध्ये तणावपूर्ण शांतता : परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केला होता हवेत गोळीबार

बेळगावात दंगलप्रकरणी ५५ अटकेत
बेळगाव : येथील गांधीनगरमध्ये रविवारी रात्री झालेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी ५५ जणांना अटक केली आहे. क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून ही घटना घडली होती. सोमवारी दिवसभर बेळगावमध्ये तणावपूर्ण शांतता होती.
रविवारी रात्री दंगलखोरांनी तुफान दगडफेक केली होती. जमावाने ३० पेक्षा जास्त दुचाकी व चारचाकी गाड्यांची तसेच अनेक घरांची तोडफोड केली होती. पोलिसांचे एक वाहनही पेटविले. दगडफेकीत २० जण जखमी झाले होते. जखमींमध्ये एक पोलीस अधिकारी, सहा पोलिसांचा समावेश आहे. परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या आठ नळकांड्या फोडाव्या लागल्या; तरीही जमाव नियत्रंणात आला नाही. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्याने रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळीबार केला. गोळीबार केल्यावर जमाव पांगला आणि परिस्थिती थोडी नियंत्रणात आली. सध्या गांधीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
रविवारी दुपारी कन्नड शाळेच्या मैदानावर झालेल्या क्रिकेट सामन्यातील किरकोळ कारणामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी दंगलीबाबत अद्याप काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. परगावांहून पोलीस फौजफाटा मागविण्यात आला आहे. पोलिसांनी सोमवारी सायंकाळपर्यंत ५५ जणांना अटक केली आहे.
रविवारी दुपारी सरकारी कन्नड, मराठी आणि उर्दू शाळेच्या मैदानावर मुले क्रिकेट खेळत होती. यावेळी एका व्यक्तीने हरकत घेतली. याला दुसऱ्या गटाच्या पालकांनी विरोध केला. नंतर हे प्रकरण इतरांनी हस्तक्षेप करून मिटविले. क्रिकेट खेळताना पुन्हा दोन संघात वाद निर्माण झाला. नंतर मैदान रिकामे करण्याची मागणी करण्यात आली. त्यास दुसऱ्या गटाने हरकत घेतली. त्यातून दोन्ही गटांत वादावादी झाल्यावर हे प्रकरण मिटविण्यात आले; पण रविवारी रात्री मैदानावरील वादाने हिंसक वळण घेतले. एका गटाच्या जमावाने आपल्या मुलांना मैदानावर खेळू दिले नाही म्हणून दुर्गामाता रोडवर पार्क करण्यात आलेल्या वाहनांची मोडतोड, जाळपोळ करण्यास सुरुवात केली. याला तेथील रहिवाशांकडून प्रतिकार केला. रात्री अकरा वाजता पोलिसांना हिंसाचाराची माहिती मिळाल्यावर पोलीस तेथे गेले, तर त्यांच्या वाहनावर दगडफेक करून वाहन पेटविण्यात आले. नंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून हवेत गोळीबार करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस आयुक्त एस. रवि, पोलीस उपायुक्त अनुपम अगरवाल यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी गांधीनगर येथे धाव घेतली. पोलीस कुमकही मागवून परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यात आली. सध्या गांधीनगर भागात १४४ कलम लावण्यात आले आहे . (प्रतिनिधी)