तीन वर्षांत ५,२५४ गर्भपात
By Admin | Updated: February 4, 2015 00:01 IST2015-02-03T23:42:44+5:302015-02-04T00:01:16+5:30
जिल्ह्यातील संख्या चिंताजनक : सर्वांत कमी मुलींचा दर असलेल्या ‘करवीर’चा सर्व्हे करणार

तीन वर्षांत ५,२५४ गर्भपात
भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -जिल्ह्यात २०११ सालापासून गेल्या तीन वर्षांत तब्बल ५,२५४ महिलांनी गर्भपात केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून दरवर्षी गर्भपात करणाऱ्या मातांची संख्या वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गर्भपाताची नेमकी कारणे कोणती, याचा शोध घेण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यात सर्वांत कमी मुलींचा जन्मदर असलेल्या करवीर तालुक्याची निवड आरोग्य विभागाने केली आहे. या तालुक्यात गर्भपात करून घेतलेल्या २०१ महिलांची भेट घेऊन त्यांच्याकडून गर्भपाताची कारणमीमांसा जाणून घेतली जाणार आहे.
दरवर्षी आरोग्य विभाग अंगणवाडी सेविका व प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविका यांच्या माध्यमातून गर्भपात करणाऱ्या महिलांची नोंद ठेवते. या नोंदीतील आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षांत प्रत्येकवर्षी गर्भपात करणाऱ्यांच्या संख्येत सरासरी ३०० ते ५०० अधिक वाढ नोंदविली आहे. विशेष म्हणजे शहरी आणि सधन भागात गर्भपाताचे प्रमाण अधिक आहे. प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे गर्भचिकित्सेची सुविधा शहर, तालुका, निमशहर या ठिकाणीही सहजपणे उपलब्ध आहे. गर्भधारणा झाल्यानंतर चिकित्सेत लिंग निदान, शारीरिक व्यंग निदर्शनास येते. प्रसूतीच्यावेळी धोका असल्याचेही आधीच समजते. शारीरिक व्यंग आणि मातेच्या जिवाला धोका असल्यास डॉक्टरच गर्भपाताचा सल्ला देतात. या कारणांसाठी गर्भपात करण्यावर कोणाचा आक्षेप नाही.
परंतु, लिंगनिदान करून स्त्रीभ्रूणाचा गर्भपात करून घात करणे कायद्याने गुन्हा आहे. स्त्रीभ्रूणाची हत्या वाढल्यानेच समाजात मुलींची संख्या झपाट्याने खालावत आहे. म्हणूनच आरोग्य विभाग स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने दोन वर्षांपासून व्यापक जागृती करीत आहे.
२०११-१२ या वर्षात १३४९ महिलांनी गर्भपात केल्याची नोंद आहे. पुढील २०१२-१३ या वर्षात यामध्ये वाढ होऊन हा आकडा १६०१ इतका नोंदविला गेला. गेल्या वर्षात तब्बल ७०३ गर्भपातांची अधिक नोंद झाली असून हाच आकडा २३०४ इतका झाला आहे. हे प्रमाण चिंताजनक असून मुलगाच हवा याच मानसिकतेतून स्त्रीभ्रूण असल्यास गर्भपाताचे प्रमाण वाढले असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पुढे येत आहे. मात्र, गर्भपाताचे नेमके कारण शोधून उपाययोजना करण्यासाठी पहिल्या टप्प्यात करवीर तालुक्यातील गर्भपात करून घेतलेल्या मातांची माहिती संकलित केली जाणार आहे व त्यांच्याशी संवाद साधून अहवाल बनविला जाणार आहे.
गर्भपाताचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर करवीर तालुक्याच्या सर्व्हेला लवकरच सुरुवात होईल. सर्व्हेत गर्भपात करून घेतलेल्या मातांची महिला आरोग्य कर्मचारी यांच्यातर्फे थेट संवाद साधून प्रश्नावली स्वरूपात माहिती घेण्यात येणार आहे.
- डॉ. आर. एस. आडकेकर,
जिल्हा आरोग्य अधिकारी