पहिल्याच दिवशी ५२ टक्के कोरोना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:21 IST2021-01-17T04:21:34+5:302021-01-17T04:21:34+5:30
कोल्हापूर : काहीशी धाकधूक, कुतूहल तरी कोरोनावर मात करायचीच, असा चंग बांधत उत्साही व जल्लोषी वातावरणात शनिवारी कोरोना प्रतिबंधक ...

पहिल्याच दिवशी ५२ टक्के कोरोना लसीकरण
कोल्हापूर : काहीशी धाकधूक, कुतूहल तरी कोरोनावर मात करायचीच, असा चंग बांधत उत्साही व जल्लोषी वातावरणात शनिवारी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला कोल्हापुरातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला. पहिल्याच दिवशी ५२ टक्के लसीकरण झाले. यावेळी मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी यांच्यासह प्रमुख लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी स्वत: केंद्रावर उपस्थित राहून उत्साह वाढवला. लस टोचून घेणाऱ्यांचे फुले देऊन अभिनंदनही केले. केंद्रावर रांगोळ्यांसह, सजावट करुन लसीकरणाचा पहिला दिवस आनंदमयी केला.
गेले दहा महिने देशात धुमाकूळ घातलेल्या कोरोनाला अटकाव करण्यासाठी ऑक्सफर्ड संशोधित व पुण्याच्या सिरम कंपनीद्वारे उत्पादित ‘कोविशिल्ड’ ही लस देण्यास देशभरात एकाचवेळी सुरुवात झाली आहे. पंतप्रधानांनी दिल्लीतून संबोधन केल्यानंतर प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात झाली. नियोजनाप्रमाणे पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनाच लस टोचली जाणार असल्याने केंद्रावर तशी व्यवस्था करण्यात आली होती. लसीकरण केंद्राचा परिसर रांगोळ्या, फुगे आणि फुलांनी सजविण्यात आला होता. सेवा रुग्णालयातील वातावरण तर जल्लोषी होते. स्वत: जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, सीपीआरच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांच्यासह डॉक्टर, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
चौकट ०१
अक्षता माने ठरल्या पहिल्या लाभार्थी
कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयातील अक्षता विक्रम माने या आरोग्य कर्मचारी कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या लाभार्थी ठरल्या. विशेष म्हणजे शनिवारी त्यांचा वाढदिवस होता. लसीकरणानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.
चौकट ०२
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज, कागल तर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिरोळ ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्राला भेट देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. खासदार धैर्यशील माने यांनी आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांच्यासमवेत इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात जाऊन लसीकरण करुन घेतलेल्यांचा सत्कार केला.
चौकट ०३
सेवा रुग्णालयात स्वत: जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते. लसीकरणानंतर त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांसह हात उंचावून जल्लाेष केला. लस टोचून घेणाऱ्यांचाही प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.
चौकट ०४
लसीकरणात महिलांचा पुढाकार
सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील एकूण ११ केंद्रांवर १,१०० लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यापैकी ५७० जणांनी लस टोचून घेतली. यात पुरुष आरोग्य कर्मचारी १०४ तर महिला कर्मचारी ४६६ होत्या. महिलांचे प्रमाण पुरुषांच्या चौपट होते.
चौकट ०५
ग्रामीण पुढे, शहर मागे
लसीकरणाच्या पहिल्या दिवशी ५२ टक्के लसीकरण झाले. मोठ्या प्रमाणावर जनजागृती करुनदेखील सीपीआर आणि महापालिका क्षेत्रात लसीकरणाला प्रतिसाद मिळाला नसल्याने एकूण टक्केवारी घसरली. ग्रामीण भागातील ६ केंद्रात ७० टक्के लसीकरण झाले. याचवेळी सीपीआरमध्ये अवघे १३ टक्के तर महापालिकेच्या ५ केंद्रात केवळ ३७ टक्के लसीकरण झाले.
(जोड चौकट देत आहे)